कलाविश्वात दररोज असंख्य कलाकारांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. अनेक नवनवीन कलाकार या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. मात्र, काही कलाकार असे आहेत जे वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायेत. त्यातलंच एक नाव म्हणजे मृणाल कुलकर्णी (mrinal kulkarni). 'अवंतिका', 'सोनपरी' अशा कितीतरी मालिकांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच मृणालने सासूबाईच्या नव्या भूमिकेत एन्ट्री केली आहे. त्यामुळे सध्या मृणाल तिच्या कुटुंबामुळे चर्चेत येत आहे. यामध्येच तिने तिच्या नवऱ्यासोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मृणालने अलिकडेच तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच विराजसच्या बाबांसोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. मृणाल अनेकदा तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट वा कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. परंतु, यावेळी तिने शेअर केलेला फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत तिने हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, मृणालने शेअर केलेल्या फोटोवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. १० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णीचं रुचिर कुलकर्णीसोबत लग्न झालं. रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत. बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं.