Join us

लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला फसवणूकीचा प्रकार; खोटा फोन करुन पैसे उकळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:19 AM

मुग्धा गोडबोले यांनी त्यांच्यासोबत घडलेला फसवणुकीचा प्रकार आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे.

डिजिटल क्रांतीमुळे बँकिंग व्यवहार हा एका बटणावर झाला आहे. आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असून अशा प्रकारच्या घटना सतत कोठे ना कोठे घडत असतात. सायबर गुन्ह्यांमुळे अनेकांचा पैसा डोळ्यांदेखत गायब झाला आहे.  सामान्य, निष्पाप लोकांना फसवून , ऑनलाइन माध्यमातून त्यांची फसवणूक करून पैसे उकळणाऱ्या अनेक बदमाशांचे गुन्हे वाढले आहेत. असाचा काहीसा प्रकार लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांच्यासोबत घडला आहे. 

मुग्धा यांनी त्यांच्यासोबत घडलेला फसवणुकीचा प्रकार आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे. त्यांनी लिहलं, '५ फेब्रुवारीला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉडचा प्रयत्न. मी दुसऱ्या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अश्यातच मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की, मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले की ते पैसे मी तुमच्या अकाऊंटवर परत जमा करावेत. १२,५०० रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं'.

त्या म्हणाल्या, 'त्याने आधी १०,००० रुपये transfer केल्याचा मेसेज आला आणि मग २५००० रुपये पाठवल्याचा मेसेज आला. त्याच वेळी माझ्या gpay अकाऊंटवरही मेसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं. आणि मग तो म्हणू लागला की मी चुकून २.५०० च्या ऐवजी २५,००० ट्रान्स्फर केले आहेत तर कृपया ते परत करा. मधल्या काळात मी नवऱ्याशी संपर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाहीये. एकीकडे या माणसाचे सतत फोन येत होते. त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला ओरडले, पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा'. 

त्यांना पुढे सांगितलं, 'माझ्या नवऱ्याने त्याच्याकडे आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंटचा स्क्रीन शॉट मागवले. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला आहे. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे. माझ्या सुदैवाने मी ह्याला बळी पडले नाही. पण ह्याकडे लक्ष द्या. रोज नवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. ह्यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरा समोर नसू ह्याचाही कदाचित अंदाज होता. डोळे कान आणि मेंदू २४ तास चालू ठेवणं ह्याला आता पर्याय उरलेला नाही'. या पोस्ट मधून मुग्धा यांनी सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमराठी चित्रपट