गेल्या कित्येक दिवसांपासून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते. अखेर आज, ३१ ऑगस्टला गणरायाचं अनेकांच्या घरी आगमन झालं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. घरात एकदा गणरायाची स्थापना झाली की पुढील ५ ते ६ दिवस दररोज गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. यात अभिनेत्री निवेदिता सराफदेखील (Nivedita Saraf) मागे नाहीत. नुकतीच त्यांनी एक गोड पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे.
गणरायचं एकदा घरी आगमन झालं की पुढचे काही दिवस सारेच जण त्याची मनोभावाने पूजाआर्चा करतात. त्याच्या सेवेत कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही याकडेच साऱ्यांचं लक्ष असतं. यात खासकरुन बाप्पासाठी दररोज वेगवेगळा नैवेद्यही केला जातो. मात्र, दररोज कोणता वेगळा पदार्थ करावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यांच्या याच प्रश्नावर निवेदिता सराफ यांनी उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी छान अशी नारळाच्या दुधातील रव्याच्या खीरीची रेसिपी शेअर केली आहे.
"लाडका बाप्पा येतो आहे. बाप्पाच्या पाहुणचाराला बनवा नैवद्य त्याच्या आवडीचा अगदी खास. केशर घालून तयार केलेली नारळाच्या दुधातील रव्याची खीर तुम्ही नक्की तयार करा. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दरम्यान, मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. यात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, अभिज्ञा भावे या कलाकारांनी मोठ्या थाटात बाप्पाचं स्वागत केलं आहे.