Join us

'कश्मीर की कली' मध्ये झळकली होती ही मराठी अभिनेत्री, २७ वर्षांपूर्वी झालं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:53 AM

त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो अशीही ओळख मिळाली होती.

मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही सिनेइंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री म्हणून पद्मा चव्हाण (Padma Chavan) यांची ओळख आहे. १२ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. आज त्यांना जाऊन २७ वर्ष झाली आहेत. अगदी कमी कालावधीत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती.

पद्मा चव्हाण यांनी अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानेही त्यांनी भुरळ घातली होती. त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो अशीही ओळख मिळाली होती. खुद्द आचार्य अत्रेंनीच त्यांना हा किताब दिला होता. सौंदर्याचं अॅटम बॉम्ब असंही त्यांनी म्हटलं होतं. 'सासू वरचढ जावई','लग्नाची बेडी','गुपचूप गुपचूप' या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर हिंदीतील 'कश्मीर की कली' सारख्या प्रसिद्ध सिनेमात त्यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर यांच्याबरोबर काम केले. 

कशी झाली सुरुवात ?

पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला. सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या. लहानपणापासून पद्मा यांना कधी अभ्यासात रस आला नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन त्या अभिनयाकडे वळल्या.१९५९ साली वयाच्या १५व्या वर्षीच भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. नंतर त्यांनी 'अवघाची संसार', 'देवघर', 'अशी असावी सासू', 'आराम हराम आहे', 'अनोळखी' अशा अनेक सिनेमांत काम केलं. याशिवाय 'अंगुर', 'नरम गरम', 'कश्मीर की कली', 'जीवनधारा' अशा काही हिंदी सिनेमात काम करत बॉलिवूड गाजवलं. 

 १९६६ साली पद्मा चव्हाण दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतरही त्यांचं काम सुरुच होतं. १९७५ साली 'या सुखांनो या' आणि १९७६ साली 'आराम हराम है' या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. १२ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. आजही त्यांची आठवण काढली जाते.

टॅग्स :मराठी अभिनेताबॉलिवूड