पर्ण पेठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाची छाप पाडली. 'फास्टर फेणे', 'YZ', 'रमा माधव', 'बघतोस काय मुजरा कर', 'मीडियम स्पायसी', 'अश्लील उद्योग' मित्र मंडळ यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पर्ण 'विषय हार्ड' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यग्र आहे.
'विषय हार्ड' सिनेमाच्या निमित्ताने पर्ण पेठेने 'अजब गजब' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ग्लॅमरस भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबरोबरच पर्णने ऑन स्क्रीन बिकिनी घालणाऱ्या अभिनेत्रींच्या धाडसाचं कौतुकही केलं. ती म्हणाली, "मला ग्लॅमरस भूमिका करायची खूप इच्छा आहे. पण, कोणीतरी अशा भूमिका ऑफरही केल्या पाहिजेत. गोड, क्यूट या टॅगचा मला कंटाळा आला आहे. ते मोडण्यासाठी मी माझ्या परिने अनेक प्रयत्न करून बघते. अडलंय का? सारखं वेगळी भूमिका असलेलं नाटक मी केलं. मलाही या गोड क्यूट टॅगमध्ये अडकायचं नाहीये. सिनेमात ग्लॅमरस दिसणं, सेक्सी दिसणं ही खूप अवघड गोष्ट आहे, असं मला वाटतं. सिरीयस भूमिका किंवा इंटेन्स सीन्स करणं हे तालिमा करून करता येतं. पण, ग्लॅमरस आणि सेक्सी दिसण्यासाठी खूप मेहनत लागते. ते एक वेगळं कौशल्य आहे असं मला वाटतं. मला अशा भूमिका करायला आवडतील. त्या भूमिका करणाऱ्यांचा मला आदरही आहे".
"मला ग्लॅमरस भूमिका करायची खूप इच्छा आहे. कारण, एका कलाकारासाठीदेखील हे खूप आवाहानात्मक आहे. सेक्सी दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या बॉडीबरोबर कम्फर्टेबल असलं पाहिजे. केवळ फिजिकलीच नाही तर मेन्टलीदेखील हे असावं लागतं. बॉडी फ्लॉन्ट करताना सेल्फ डाऊट नसायला हवा. तुम्हाला स्वत: वर कॉन्फिडन्स असला पाहिजे. हिरांमडी आपण सगळ्यांनीच बघितला असेल. ज्या पद्धतीने अदिती रावने त्यात काम केलंय. स्वत:ला कॅरी केलंय. बिकिनी घालायला खूप कष्ट लागतात. ती सोपी गोष्ट नाहीये. लोक भयंकर ट्रोलिंग करतात. पण, ते करायला खूप कष्ट लागतात. ती नजाकत आणायला, सेक्सीनेस दाखवायला कष्ट लागतात. इतकं सोपं नाहीये," असं म्हणत पर्णने बिकिनी घातल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं आहे.
पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' सिनेमा येत्या ५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात पर्ण मुख्य भूमिकेत असून डॉली ही भूमिका ती साकारताना दिसणार आहे. सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात पर्ण पेठेसब सुमित, नितीन कुलकर्णी, भूमी पाटील, चैत्राली इनामदार या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.