कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरी लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. तर काही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. अभिनेत्री पूजा सावंतच्या घरीदेखील लगीनघाई सुरू आहे. या लग्न सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भावाच्या लग्नात पूजा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
पूजाचा भाऊ हेमंत दळवी याचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. भावाच्या संगीत सोहळ्यात सावंत सिस्टर्सने धमाल आणली. पूजाने बहीण रुचिरा आणि तिच्या इतर बहिणींसह भावाचा संगीत सोहळा गाजवला. आलिया भटच्या राधा या गाण्यावर त्यांनी डान्स केला. याचा व्हिडिओ पूजाची बहीण रुचिराने शेअर केला आहे. या व्हिडिओत पूजा आणि तिच्या बहिणी डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, पूजा सावंतही याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पूजाने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. पूजाच्या नवऱ्याचं नाव सिद्धेश असं आहे. सिद्धेश हा इंजिनीयर असून कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियाला असतो. लग्नानंतर पूजादेखील परदेशात स्थायिक झाली आहे. काम आणि शूटिंगनिमित्त ती भारतात येत असते.