Join us  

मराठमोळ्या थाटात 'मिस कलरफूल' पूजा सावंतचं येणार नवीन गाणं, टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 9:02 AM

पुजाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

'मिस कलरफूल' म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठीसह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय करुन तिनं लोकप्रियता मिळवली आहे. पुजाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. "नाच गो बया" या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. 

पुजानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. तिनं लिहलं, 'आमच्या नवीन गाण्याचा टीझर आलेला आहे. नाच गो बया हे गाणं येत आहे येत्या ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता  “Laybhari Music” युट्युब चॅनेल वर. ताई,माई, अक्का.. सज्ज व्हा तुमच्या हक्काच्या “नाच गो बया” साठी..". पूजाबरोबर या गाण्यात आयुष संजीव, निक शिंदे, अक्षया नाईक, आकांक्षा गाडे आणि तश्वी भोईर हे कलाकार झळकणार आहेत.

'नाच गो बया' गाण्याचं दिग्दर्शन प्रशांत नाकतीने केलं आहे. तर हे गाणं लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं जाणार आहे. सध्या सर्वत्र या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधी पुजा 'मुसाफिरा' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात पुष्कर जोग, दिशा परदेशी, पुष्कराज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

दरम्यान,  महाराष्ट्राची ही लाडकी अभिनेत्री काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली. पूजाने अरेंज मॅरेज पद्धतीने सिद्धेश चव्हाण यांच्यासोबत २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न केलं आहे.  सिद्धेशबरोबर लग्न करुन तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सिद्धेश हा डिस्नी कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. पूजाही काही काळासाठी त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट झाली होती. पण, आपल्या कामासाठी सध्या ती महाराष्ट्रात परतली आहे. 

टॅग्स :पूजा सावंतयु ट्यूबसेलिब्रिटीमराठी अभिनेता