Prajakta Mali: प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिनं अनेक मालिका-चित्रपटांत काम केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. नुकतंच प्राजक्तानं तिचा महिन्याचा खर्च (Prajakta Mali Monthly Expenses ) किती असतो, हे सांगितले आहे.
प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. चाहत्यांना तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते. नुकतंच 'सुमन म्युझिक मराठी' या युट्यूब चॅनेलवरील 'आम्ही असं ऐकलंय' या कार्यक्रमात प्राजक्ता माळी सहभागी झाली होती. यावेळी प्राजक्ताला तिचा महिन्याचा खर्च किती असतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तरात ती म्हणाली, "मला खूप वर्षांपासून गणिताला बसायचं आहे की माझा खर्च किती होतो, पण ते होतच नाहीये. पण, फार नाहीये. मी कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते. म्हणजे मी कपडे लवकर फेकून देत नाही, नवीन काही भांडी वगैरे आणण्याची मला काही आवड नाही, आधीचं मटेरिअल संपल्याशिवाय मी मेकअप वैगेरे काही आणत नाही, असं सगळं असल्यामुळे कमी खर्च असावा. पण, तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखभर असेल", असा एक अंदाजे आकडा तिने सांगितला आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा फुलवंती सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच तिने निर्मिती बाजूही सांभाळली होती. याशिवाय, काहीदिवसांपुर्वी तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.