आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच. सोशल मीडियावर सतत असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अनेक कलाकार स्वत:हून असे फोटो शेअर करत बालपणीच्या आठवणी सांगतात. सध्या आम्ही असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. फोटोत एक मराठमोळी अभिनेत्री तिच्या भावासोबत दिसतेय. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत?मराठी चित्रपटांत आणि शो गाजवणारी, आपल्या दिलखुलास हास्याने चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी ही अभिनेत्री कोण हे अद्यापही तुमच्या लक्षात आले नसेल तर आम्ही सांगतो.
ही आहे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ).प्राजक्ताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक बालपणीचे फोटो आहेत. वेळोवेळी ती असे फोटो शेअर करत असते. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून प्राजक्ता ओळखली जाते. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गेली दोन दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान अभिनयासोबतच प्राजक्तानं आता आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिने स्वत:चा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
प्राजक्ताला अगदी लहानपणापासून डान्सची आवड होती. म्हणून वयाच्या 6व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर जेव्हा ती 13 किंवा 14 वर्षांची होती तेव्हा स्टार प्लसवरील 'क्या मस्ती क्या धूम' या रिअॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा तिने जिंकली देखील होती. त्यानंतर तिने अनेक नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये तसेच डान्स शोमध्ये भाग घेतला होता.
प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत तिनं साकारलेल्या मेघा देसाई या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे. नुकतीच ती ‘पावनखिंड’ या सिनेमात झळकली. चित्रपटातील तिच्या या भुमिकेचंही चांगलंच कौतुक होतंय.