मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सतत चर्चेत असते. कधी फोटो, कधी राजकीय पोस्ट या ना त्या कारणानं कायम तिची चर्चा होते. पण यावेळी तिची चर्चा एका वेगळ्या कारणानं होतेय आणि यावरून फेसबुकवर ती जबरदस्त ट्रोल होतेय.काही दिवसांपूर्वी तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठींबा देत, मशिदींवरच्या भोंग्याबद्दलची पोस्ट केली होती. यावरून ती जबरदस्त ट्रोल झाली होती. सध्या एका फेसबुक पोस्टवरून चाहत्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. झालं काय तर प्राजक्ताने तिचे काही नवीन फोटो फेसबुकवर शेअर केलेत. पण या फोटोचं कॅप्शन देताना तिच्या हातून एक मोठी चूक झाली. याचमुळे तिला ट्रोल केलं जातंय.
मराठीतील दिवंगत कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी तिने या फोटोंना कॅप्शन म्हणून दिल्या आहे. ‘थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा…...,’अशा या ओळी आहेत. मात्र या ओळींखाली शांताबाईंचे नाव देताना तिने शांता शेळकेऐवजी ‘शांती शेळके’ असं लिहिलं आहे. नेमक्या याच गोष्टीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी प्राजक्ताला तिची ही चूक लक्षात आणून दिली. पण वृत्त लिहिपर्यंत तरी तिने तिच्या पोस्टमधली चूक सुधारली नव्हती.
अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘भोंग्याचा गोंगाट हिच्या मस्तकात इतका भिनलाय की सुप्रसिद्ध कवयित्रीचे नाव सुद्धा विसरली. या असल्या चुका चूकून होत नसतात. हे एक विकृत षडयंत्र,’अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली. कवयित्रीचे नाव शांताबाई शेळके असे आहे, जरा आदर दाखवावा, अशा शब्दांत एका युजरने प्राजक्ताला तिची चूक लक्षात आणून दिली.
इतक्या लोकांनी सांगूनही ताईनी नाव एडिट केलं नाही, वाह ताई वाह, अशी खोचक कमेंट एकाने केली. शांताबाई शेळके असं हाय त्ये, शांती शेळके तुमच्या वर्गातील असेल, अशी कमेंट अन्य एकाने केली. ज्यांची ओळ लिहून लाईक्स मिळवायचे किमान त्यांचं नाव तरी व्यवस्थित लिहावं. एवढं तरी सौजन्य असावं. शोभत नाही तुला हे प्राजक्ता, अशा शब्दांत एका युजरने आपली नाराजी व्यक्त केली.