प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पवित्रा रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर आणि मिसेस सदाचारी', 'मितवा' अशा गाजलेल्या सिनेमांतून प्रार्थनाने अभिनयाचा ठसा उमटवला. प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रार्थना पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते.
प्रार्थनाने २०१७ साली अभिषेक जावकरशी विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज प्रार्थनाचा पती अभिषेकचा वाढदिवस आहे. रोमँटिक व्हिडिओ शेअर करत प्रार्थनाने नवऱ्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थनाने तिच्या सोशल मीडियावरुन नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "अगर तुम साथ हो" हे गाणं दिलं आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत प्रार्थना म्हणते "मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए, आँखों मे तुम को भरूं, बिन बोले बातें तुमसे करूँ, गर तुम साथ हो!! हॅपी बर्थ माय वर्ल्ड" असं कॅप्शन दिलं आहे. प्रार्थनाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले आहे. मूळ 'सिंघम' चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. त्याची 'रेड बल्ब स्टुडिओज' नावाची स्वतःची निर्मितीसंस्था आहे. याद्वारे त्याने अनेक मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. दरम्यान, 'पवित्रा रिश्ता' मालिकेनंतर प्रार्थनाने 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन केलं होतं. या मालिकेत ती श्रेयस तळपदेबरोबर मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतील प्रार्थनाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं.