आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टी समृद्ध करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीसुद्धा गाजवली. त्यामुळे आज त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. 'धुमधडाका', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'अशी ही बनवाबनवी' असे कितीतरी सिनेमा त्यांनी सुपरहिट केले. परंतु, त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे (priya berde) यांनाही या काळात समाजाकडून, नातेवाईकांकडून अनेक चांगले-वाईट अनुभव आले.
एका मुलाखतीमध्ये प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर नेमकं काय घडलं होतं. त्यांच्या आजारपणातले दिवस कसे होते हे सांगितलं. तो काळ त्यांच्यासाठी प्रचंड कठीण होता. मात्र, तरीदेखील आपल्या दोन मुलांसाठी त्या उभ्या राहिल्या.
"लक्ष्मीकांत ज्यावेळी आजारी होते त्यावेळीच मला कळलं होतं की, जे सुरु आहे ते ठीक दिसत नाहीये. कारण, आपल्याला समोर बघताना कळत होतं की हे पर्व आता संपत आलेलं आहे. त्यावेळी मला कुठेतरी जाणवलं की आपल्याला आता सिंधुताई व्हायला लागणार. आपल्याला जगावं लागणार. लक्ष्मीकांत ज्यावेळी खूप आजारी होते त्यावेळी मी त्यांना माझ्या मुलासारखं सांभाळलं," असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "त्या काळात मी तीन मुलांचा सांभाळ केला. लक्ष्मीकांत, आई-वडील गेल्यानंतर मी ज्या त्रासातून गेले ते आठवलं तरी मला रडू येतं. कारण, त्या काळात तुम्ही एकटेच असता. तुमच्यासोबत कोणी नसतं. माणूस गेल्यानंतर फक्त १३ दिवस लोक तुमच्या पाठीवरुन हात फिरवायला येतात. त्यानंतर कोणीच नसतं. पण, त्यावेळी कोणी आलं नाही तेच माझ्यासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले."
दरम्यान, प्रिया बेर्डे 'सिंधूताई माझी आई' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यापूर्वी त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.