मराठी कलाविश्वातील नावाजलेली आणि तितकीच कणखर अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे (Priya berde). 'बजरंगाची कमाल', 'अशी ही बनवाबनवी', 'धमाल जोडी', 'जत्रा', 'घनचक्कर' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये काम करत त्यांनी त्यांची अभिनयशैली दाखवून दिली. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी मोठ्या हिमतीने त्यांचा संसार सांभाळला. घर आणि करिअर या दोघांचा बॅलेन्स त्यांनी केला. अलिकडेच त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्पर्धेच्या युगात इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींसोबत त्यांचं नातं कसं होतं हे त्यांनी सांगितलं.
८० च्या दशकात निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अश्विनी भावे आणि प्रिया बेर्डे या सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांचे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीची गर्दी करायचे. परंतु, या दिग्गज अभिनेत्रींमध्ये नेमकं कसं नातं होतं, त्यांच्यातील मैत्री कशी होती हे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. खासकरुन त्यांनी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या शांत स्वभावाविषयीदेखील भाष्य केलं.
'माणूस गेल्यानंतर १३ दिवस लोक..'; प्रिया बेर्डेंनी सांगितलं लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर काय घडलं
"आताच्या काळात कॅटफाईट्स होतात हे आपण ऐकतो. तर, त्या काळात तुम्ही, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ अशा बऱ्याच जणी होत्या. त्यामुळे तुमचं नातं कसं होतं की आतासारखंच होतं?", असा प्रश्न प्रिया बेर्डे यांना विचारण्यात आला.
काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?
"त्या काळात दोन हिरो होते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. बाकीचेही होतेच रमेश भाटकर, अजिंक्य देव, प्रशांत दामले,महेश कोठारे होते. पण, हे दोन म्हणजे अगदीच लोकप्रिय होते. आणि बाकी १०-१५ जणी होत्या. मात्र, कोणाला कसली तक्रार नव्हती. सगळ्या समाधानी होत्या. प्रत्येक जण त्यांच्यासोबत ५-६ चित्रपट करतच होते. आम्ही पण एकत्र काम केलं होतं. 'अशी ही बनवाबनवी'मध्ये तर या सगळ्यांसोबत मी नवीन होते, पण, त्यांनी कधीच मला ती गोष्ट जाणवून दिली नाही, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "अॅटिट्यूड वगैरे कोणाला नव्हता. त्यातल्या त्यात वर्षा उसगांवकर खूप कमी बोलायची. मला वाटायचं तिला खूप अॅटिट्यूड आहे. पण तसं नाही ती पण खूप छान आहे. पुढे जशी ओळख झाली तसं ते कळत गेलं. काही लोकांना बोलायला थोडा वेळ लागतो तसं होतं. तसंच माझं आणि निवेदिता चांगलं बॉण्डिंग आहे. आम्ही गप्पा मारतो इतकी चांगली मैत्री आहे.
दरम्यान, इंडस्ट्रीतल्या अन्य अभिनेत्रीविषयी बोलत असतानाच मी मितभाषी आहे हेदेखील त्यांनी आवर्जुन सांगितलं. प्रिया बेर्डे अभिनेत्री असण्यासोबतच व्यावसायिकादेखील आहेत. त्यांचे हॉटेल्सदेखील आहेत.