'अशी ही बनवाबनवी', 'बजरंगाची कमाल', 'घनचक्कर', 'जत्रा' अशा कितीतरी सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे (prreeya berde). दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर प्रिया यांनी ९० चा काळ गाजवला. विशेष म्हणजे आजही त्या कलाविश्वास सक्रीय आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगत असते. बऱ्याचदा प्रिया बेर्डे कलाविश्वात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत असतात. यावेळी त्यांनी सध्या सुरु असलेल्या लावणी कार्यक्रमांविषयी मत व्यक्त केलं आहे.
अलिकडेच प्रिया बेर्डे यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्या सादर करण्यात येणारी लावणी, त्यात केले जाणारे अंगविक्षेप यावर भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?
"लावणी या नृत्यप्रकारात सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात जेव्हा काही मुली लावणी सादर करतात ते पाहून वाईट वाटतं नाही पण, अलिकडे ज्या प्रकारे लावणी सादर केली जाते त्याची पद्धत बदलली आहे हे जाणवतं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी या समस्या नव्हत्या. मीदेखील पूर्वी लावणी करायचे. पण, मी कधीच कोणाच्या नजरेत नजर घालून डान्स केला नाही. आम्ही दूर कुठेतरी पाहून अदा किंवा नृत्य सादर करायचो. पण आता नऊवारी साडीपासून सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मुळात प्रेक्षकांनाही हे सगळं आवडतंय," असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "प्रेक्षक हल्ली दर्जेदार लावण्या पाहायला कुठे येतात, हीच तर खरी मोठी समस्या आहे. लावणी हा एक अदाकारीचा भाग आहे. मी तोंडाला स्कार्फ गुंडाळून हल्ली लावणीचे कार्यक्रम पाहते. ते लोक काय करतात हे मला पाहायचं असतं. पहिला एक दोन डान्समध्ये लावणी दाखवली जाते. त्यानंतर मग पूर्ण डान्स हा वेगवेगळ्या प्रकारातील असतात. जे अजिबात पाहण्यासारखे नसतात”, असेही प्रिया बेर्डेंनी सांगितले. दरम्यान, सध्या प्रिया बेर्डे सिंधूताई माझी आई या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्यांच्यासोबत अभिनेता किरण माने यांनी देखील स्क्रीन शेअर केली आहे.