'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुचे अनेक चाहते आहेत. एकाच सिनेमातून तिने लाखो प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र रिंकूला खूपच माज असल्याचं अनेकांना वाटतं. रिंकू जाम अॅटिट्यूड दाखवते असं तिच्याबद्दल अनेकदा बोललं गेलं आहे. मात्र लोकांचा हाच गैरसमज रिंकूने दूर केला आहे. तिने एका मुलाखतीत आपला स्वभाव नेमका कसा आहे हे सांगितलंय.
रिंकू राजगुरु आगामी 'झिम्मा 2' या सिनेमात दिसणार आहे. निर्मिती सावंत यांच्या सूनेची तिने भूमिका साकारली आहे. सिनेमाती भूमिकेप्रमाणेच रिंकू खऱ्या आयुष्यातही अशीच आहे का असा प्रश्न तिला विचारला असता रिंकूने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी मनोरंजनविश्वला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली,'लोकांना असं वाटतं की मी खूपच बिंधास्त आहे. मी विचार न करता काहीही बोलते. तर असं नाहीए. मी त्याच्या जरा उलटी आहे. मी खूप हळवी आहे. मी शांततेत आपली आपली बसलेली असते. यामुळे लोकांना कदाचित गैरसमज होऊ शकतात की ही एकटीच बसते तिच्यात खूप माज आहे. पण मला कोणी बोललं की चटकन लागतं आणि मी समोरच्याला काही न विचार करता कधीच नाही बोलत. अरेरावी करणं,उलट उत्तरं देणं, आरडा ओरडा करणं हे मला सहनच होत नाही.'
रिंकूने मुलाखतीत तिच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले आहेत. ती लोकांमध्ये सहज मिसळणारी असून प्रत्येकासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी करणं तिला खूप आवडतं. त्यामुळे आपल्यात माज आहे हा लोकांचा गैरसमज तिने या माध्यमातून दूर केला आहे. रिंकू राजगुरुला आगामी 'झिम्मा 2' या मराठी सिनेमात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. यामध्ये तिने निर्मिती सावंत यांच्या सूनेची तानियाची भूमिका केली आहे. २४ नोव्हेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय.