कलाकार : रिंकू राजगरू, मकरंद देशपांडे, विशाल आनंद, आशिष वारंग, कांचन जाधव, तुषार कावले, अदिती पाटीलदिग्दर्शक : खुशबू सिन्हानिर्माते : समीर कर्णिक, आशिष भालेराव, राकेश राऊतस्टार: चार स्टारशैली : रोमँटीक ड्रामाकालावधी : १ तास ५८ मिनिटेचित्रपट परीक्षण - संजय घावरे
प्रेमाचं एक रूप त्यागही असतं, पण हे ज्यांना पटत नाही ते विकृत मनोवृत्तीचे प्रेमी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीलाही संपवायला मागं-पुढं पहात नाहीत. यातूनच मग अॅसिड हल्ल्यासारख्या घटना घडतात. तू माझी झाली नाहीस, तर अन्य कोणाचीही होऊ देणार नाही या भावनेला प्रेम नव्हे, तर विकृतीच म्हणता येईल. अशा विकृतीच्या बळी ठरलेल्या अनेक तरुणी आज समाजापासून तोंड लपवत जीवन जगत आहेत. स्वप्नांची झालेली राखरांगोळी पाहताना आपण न केलेल्या गुन्ह्याची सजा क्षणोक्षणी भोगत आहेत. अॅसिड हल्ल्यातच नव्हे तर एकतर्फी प्रेमाच्या बळी ठरल्यानं काळोख्या कोनाड्यात ढकलल्या गेलेल्या अनेक तरुणींची वेदना या चित्रपटात दिग्दर्शिका खुशबू सिन्हा यांनी आपल्या काहीशा वेगळ्या शैलीत मांडली आहे.
कथानक : प्रामाणिक पोलिस अधिकारी यशवंत आणि त्यांची मुलगी कृतिका यांची ही कथा आहे. लग्न करून परदेशी जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कृतिकाच्या चेहऱ्यावर कोणीतरी अॅसिड फेकतं आणि तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. एकीकडं अपराध्याचा शोध घेण्याचं काम सुरू असतं, तर दुसरीकडं न केलेल्या अपराधाची शिक्षा कृतिका भोगत असते. मनात उठलेलं विचारांचं काहूर कृतिकाला जगू देत नसतं. तिच्याच कार्यालयातील सहकारी शिरीष तिला मानसिक कोलाहालातून बाहेर येण्यास मदत करतो. मनोमन तिच्यावर प्रेम करणारा शिरीष आपल्या मनातील भावना व्यक्त करतो का? कृतिकाचं पुढे काय होतं? तिच्यावर अॅसिड फेकणारा तरुण कोण असतो याचा पत्ता लागतो का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात मिळतात.
लेखन-दिग्दर्शन : अॅसिड हल्ल्यामुळं आयुष्यातून उठलेल्या तरुणींची कथा या निमित्तानं प्रथमच मराठी चित्रपटाच्या पटलावर आली आहे. मनोरंजक मसाल्यांचा अतिरीक्त वापर टाळत यात वास्तवदर्शी घटना अतिशय साधेपणानं सादर करण्यात आल्या आहेत. या जोडीला प्रसंगांमधील गांभीर्य राखणारे अर्थपूर्ण संवाद आहेत.
'छपाक'मध्ये दीपिका पदुकोणच्या माध्यमातून अॅसिड हल्ल्यातील तरुणींची व्यथा मांडण्यात आल्यानंतर मराठीत प्रथमच हा विषय हाताळण्यात आला आहे. चेहरा हा माणसाचं अस्तित्व मानलं जातं. चेहरा म्हणजेच कोणत्याही व्यक्तीची खरी ओळख असते, पण प्रेमांध झालेले विकृत प्रेमवीर तरुणींच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून त्यांचं अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मरणासन्न वेदना सहन करणाऱ्या तरुणींना समाजातही वाकडी झालेली तोंडं पाहण्याची सजा सहन करत जीवन व्यतित करावं लागतं. चित्रपट सुरू झाल्यानंतर पाचच मिनिटांमध्ये पहिला धक्का देत पुढे काय होणार याबाबत उत्सुकता जागवतो. अखेरीस पुन्हा धक्कादायक सत्य समोर येतं आणि आश्चर्यकारक शेवट पहायला मिळतो. पटकथेची मांडणी चांगली करण्यात आली असली तरी काही ठिकाणी सादरीकरणात त्रुटी राहिल्याचं जाणवतं. अखेरपर्यंत रहस्य उलगडू न देण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाल्या आहेत. गाण्यांमधील लोकेशन्स, कॅास्च्युम, कॅमेरावर्क, संकलन चांगलं आहे. जळलेला चेहरा टप्प्याटप्प्यानं सुधारल्याचं मेकअपच्या माध्यमातून अचूक दाखवण्यात आलं आहे. गोविंदागीत आणि गणेश भक्तीगीतासोबत हिंदी गाणंही चांगलं झालं आहे.
अभिनय :रिंकू राजगुरूसाठी ही भूमिका खूप आव्हानात्मक होती. हे केवळ एक कॅरेक्टर नव्हतं तर याद्वारे अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या अनेक तरुणींच्या मनातील भावना तिला सादर करायच्या होत्या. तिनं आपल्या परीनं चांगलं काम केलं आहे. मकरंद देशपांडेनं साकारलेल्या कॅरेक्टरमध्ये वडील आणि पोलीस अधिकारी असे दोन पैलू आहेत. दोन्ही पैलू मकरंदनं आपल्या काहीशा वेगळ्या शैलीत सादर केले आहेत. पदार्पणात विशाल आनंदनं ठिकठाक प्रयत्न केला आहे. आशिष वारंगनं हवालदाराच्या भूमिकेत, तर कांचन जाधवनं आईच्या व्यक्तिरेखेत चांगलं काम केलं आहे. तुषार कावले आणि अदिती पाटील यांच्या छोट्याशा भूमिकाही ठिक झाल्या आहेत.
सकारात्मक बाजू : अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणींच्या जीवनातील सत्य, त्यांनी सहन केलेल्या वेदना आणि चेहऱ्यावरच नव्हे तर त्यांच्या मनावरही झालेला आघात यात पहायला मिळतो.
नकारात्मक बाजू : मसालेपटांसोबतच कॅामेडीपटांच्या चाहत्यांना कदाचित हे सत्य पहायला आवडणार नाही. या रोमँटिक ड्रामामध्ये रोमान्सपेक्षा वास्तव अधिक असल्यानं मनोरंजनाचे क्षण फार कमी आहेत.
थोडक्यात : अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेली तरुणी पाहिल्यावर असं दु:ख शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असं वाटतं. हा चित्रपट पाहून समाजात दडलेला एखादा जरी प्रेमी अॅसिड हल्ला करण्यापासून परावृत्त झाला तरी यासाठी घेतलेली मेहनत सार्थकी लागेल. त्यामुळं त्रुटी आणि उणीवांकडे दुर्लक्ष करून एकदा तरी हा चित्रपट पहायला हवा.