सई ताम्हणकर हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. अभिनय, मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर सईने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. अभिनयाबरोबरच अदाकारांनीही सई चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईला सिनेसृष्टीत आल्यानंतर कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
अभिनयाबरोबरच सई ओळखली जाते ती तिच्या बेधडक स्वभावासाठी. अत्यंत परखडपणे ती तिची मतं मांडताना दिसते. त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही तिने तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. सिनेइंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी आलेल्या सईला कॉम्प्रोमाइज करायला सांगितल्यानंतर अभिनेत्रीला समोरच्याला चोख उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली होती. सईने 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत हा प्रसंग सांगितला.
कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर करताना सई म्हणाली, "खूप सुरुवातीला मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. त्याने मला भूमिका ऑफर केली होती. असा असा रोल आहे...पण, तुला या लोकांबरोबर compromise करावं लागेल, असा मेसेज त्याने केला होता. मी त्याला म्हणाले की हा मेसेज तू तुझ्या आईला आणि वडिलांना फॉरवर्ड कर. मला परत कधीच मेसेज किंवा फोन करू नकोस. या १५-२० वर्षांत हे माझ्याबरोबर एकदाच घडलं आहे. पण, याची शहानिशा करणंदेखील किती कठीण आहे. मेसेज करणारी व्यक्ती नक्की कोण आहे? त्याच्या फोनवरुन खरंच त्यानेच मेसेज केलाय का? हेदेखील आपल्याला माहीत नाही".
सईने टेलिव्हिजनवरुन तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. 'तुझ्याविना', 'या गोजिरवाण्या घरात', 'कस्तुरी' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. आमिर खानच्या 'गजनी' सिनेमातून सईने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. 'सनई चौघडे', 'क्लासमेट्स', 'दुनियादारी', 'नो एन्ट्री', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तू ही रे' अशा सिनेमांमध्ये ती दिसली. 'हंटर', 'भक्षक', 'इंडिया लॉकडाऊन', 'मिमी' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये सईने काम केलं आहे.