सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड, ग्लॅमरस अभिनेत्री. आता तर बॉलिवूडमध्येही तिचा बोलबाला आहे. सध्या तिचीच चर्चा आहे. सई तशी बिनधास्त अभिनेत्री. त्यामुळे तिचं पर्सनल आयुष्य कधीच लपून राहिलेलं नाही. आपल्या खासगी आयुष्याबद्दल सई बिनधास्त बोलते. नुकत्याच एका मुलाखतीत सई तिच्या बाबांबद्दल बोलली.‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने एक भावुक करणारी गोष्ट सांगितली. “वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, नैराश्य याचा तुझ्या व्यावसायिक आयुष्यावर काही परिणाम होतो का?” असं सईला विचारण्यात आलं. यावेळी सईने एक कटू आठवण शेअर केली.
सई म्हणाली...“माझं खासगी आयुष्य आणि माझं काम दोघंही एकमेकांशी निगडीत आहेत. साहजिकच दोन्ही आयुष्याचा एकमेकांवर परिणाम होतो. काही भूमिका आपसूक खासगी आयुष्यामध्ये डोकावतात. तसाचं वैयक्तिक आयुष्यामधील अनेक घटनेचा माझ्या कामावरही परिणाम होतो. ‘हाय काय नाय काय’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्याच दिवशी मी चित्रपटाच्या सेटवर हजर झाले. विशेष म्हणजे हा चित्रपट विनोदी होता....”, असं सांगताना सई काही क्षण भावुक झाली.
थेट दुर्लक्ष करायचं आणि...या मुलाखतीत ती ट्रोलिंगबद्दलही बोली.“हल्ली कशाहीवरून ट्रोलिंग होतं. दिसण्यावरून, कपड्यांवरून, तुमच्या मतांवरून कशावरूनही टीका केली जाते. पण आता ट्रोलिंग हा आमच्या व्यवसायाचा भाग आहे असं म्हणून आम्ही ते स्वीकारलं आहे. आज लोक खूप निष्ठुर आणि निर्दयी झाले आहेत. पूर्वी लोक आब राखून, विनम्रतेने व्यक्त होत असत. ते आता दिसत नाही. थेट दुर्लक्ष करायचं आणि तसंच मी करते,” असं ती म्हणाली.