Join us  

भविष्यात कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? सई ताम्हणकर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:56 AM

सई ताम्हणकरला बायोपिकसाठी कोणाची भूमिका साकारायची आहे याविषयी तिने लोकमत फिल्मीशी याविषयी खास बातचीत केलीय (sai tamhankar)

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सईला आपण विविध सिनेमांतून अभिनय करताना पाहिलंय. सईचे सिनेमे म्हणजे पैसा वसूल मनोरंजनाची हमखास गॅरंटी हे समीकरण जणू ठरलं आहे. सई ताम्हणकर तिच्या आगामी 'मानवत मर्डर' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये सईने समिंद्री ही भूमिका साकारलीय. यानिमित्ताने लोकमत फिल्मीशी खास बातचीत करताना सईने कोणत्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, याचा उल्लेख केलाय.

सईने बायोपिकमध्ये घेतलं या व्यक्तिमत्वाचं नाव

सईला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल याचा खुलासा करताना ती म्हणाली, "मला एखाद्या विशिष्ट काळाशी संबंधित नायिकांची भूमिका साकारायला खूप आवडेल. म्हणजे असं काहीतरी जे आपल्याला आता उपलब्ध आहे, पण ते उपलब्ध नाही असं समजून काम करायचं. याचं मला खूप आव्हान वाटतं. आणि हे करायला मला नक्कीच आवडेल. सावित्रीबाई फुले यांची भूमिका मला साकारायला आवडेल. याशिवाय सांगलीच्या एक क्रांतीकारी आहेत. त्यांंचं आडनाव बिरनाळे. त्यांचं नाव मला आठवत नाहीय. त्यांची भूमिका मला साकारायला आवडेल. पण प्रामुख्याने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारायला आवडेल." सईने सांगलीच्या ज्या महिला क्रांतीकारकांचा उल्लेख केला त्यांचं नाव राजमती पाटील-बिरनाळे.

सई  ताम्हणकरच्या वेबसीरिजविषयी

महाराष्ट्राला अनेक घटनांनी हादरवून सोडलं आहे. या घटना आठवल्या तरीही आजही अनेकांच्या काळजाचा ठोका सुचतो. महाराष्ट्राला हादरवणारी अशीच एक मोठी घटना म्हणजे 'मानवत हत्याकांड'. याच घटनेवर आधारीत मराठी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकर(sai tamhankar), मकरंद अनासपुरे (makrand anaspure) आशुतोष गोवारीकर. सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) अशा दिग्गज कलाकारांची या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहे. 'आत्मपॅफ्लेट' या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक आशिष बेंडे या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

टॅग्स :सई ताम्हणकरसांगली