Sakhi Gokhale: 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सखी गोखले (Sakhi Gokhale). सध्या अभिनेत्री 'वरवरचे वधू-वर' या नाटकामुळे चर्चेत आली आहे. सखी-सुव्रत यांच्या या नाटकाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सखी गोखले ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले आणि मोहन गोखले यांची लेक आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीनेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. दरम्यान, सखी ६ वर्षांची असताना मोहन गोखले यांचं निधन झालं. ते मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता होते. अशातच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आई शुभांगी गोखलेंविषयी वक्तव्य केलं आहे.
नुकतीच सखी गोखलेने 'व्हायफळ' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यादरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखलेंविषयी ती म्हणाली, "तिने प्रत्येक दु: खाच्या क्षणांना आनंद निवडला आणि त्याचं मला भयंकर कौतुक वाटतं. बाबा गेले तेव्हा मी खूप लहान होते. त्यानंतरच आयुष्य कसं जगायचं, ही तिची निवड होती आणि तिने आयुष्य आनंदाने परिपूर्ण जगायचं ठरवलं. त्यामुळे माझं आयुष्य सुखकर झालं."
त्यानंतर सखी म्हणाली, "तिने कायम माझ्याबरोबर एका पद्धतीची मैत्री ठेवली. ती माझ्यासाठी माझी आईपण होती, वडीलसुद्धा होती. भावंडांची भूमिकासुद्धा तिने निभावली. आजी-आजोबा गेल्यानंतर ती मायाही तिने मला लावली. मला वाटतं की, मला मोठं करणं, हा तिच्यासाठी मोठा टास्क होता. त्याचं मला भयंकर कौतुक वाटतं."