Join us  

कोल्हापुरी भाषेविषयी 'गाभ' फेम सायली म्हणते, 'कोल्हापुरी भाषेत जो रांगडेपणा आहे तो...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:55 PM

Sayali Bandkar: 'गाभ' या सिनेमाच्या निमित्ताने सायली कोल्हापुरी भाषा शिकली आहे.

मराठी कलाविश्वात सध्या अनेक नव्या धाटणीच्या आणि कथानकांच्या सिनेमाची निर्मिती होतांना दिसत आहे. यामध्येच एक वेगळा विषय हाताळणारा गाभ (Gabh Movie) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता कैलास वाघमारे याची मुख्य भूमिका असून त्याच्यासोबत सायली बांदकर ही स्क्रीन शेअर करणार आहे.

अलिकडेच 'गाभ' सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सायलीने या सिनेमाविषयी भाष्य केलं. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तिला कोल्हापुरी भाषा बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळे कोल्हापुरी भाषा बोलण्याचा अनुभव आणि तिच्या समोर आलेले चॅलेजेस यावर तिने भाष्य केलं.

'गाभ' या सिनेमात ग्रामीण भाषेचा वापर केला आहे. तर, तुझ्यासाठी हे चॅलेंज कसं होतं आणि तू ते कसं स्वीकारलंस?, असा प्रश्न सायली बांदकरला विचारण्यात आला होता. यावेळी बोलतांना तिने कोल्हापुरी भाषेविषयी तिचं मत व्यक्त केलं. "मी नाटक आणि एकांकिका खूप केल्या आहेत. नाटक आणि एकांकिकांमध्ये तुम्हाला विविध भाषा बोलाव्या लागतात. त्यामुळे मी मराठी, हिंदी, थोडंफार उर्दू अशा विविध भाषा बोलले आहे. पण, कोल्हापुरी भाषा मी कधीच बोलले नव्हते. पहिल्यांदाच माझ्या वाट्याला कोल्हापुरी भाषा आली होती. ज्यावेळी माझ्याकडे स्क्रिप्ट आली होती तेव्हा मी रँडम फॉलो करायची म्हणून ऑडिशन दिलं होतं. त्यात 'गिन्ना' हा शब्द होता, 'ओपोला' हा शब्द होता. मी म्हटलं आपण बोलून टाकू. म्हटलं सिलेक्ट झाल्यावर पाहू विचारु दिग्दर्शकांना जे काय आहे ते. जेव्हा मी शूटला गेले त्यावेळी ऑलरेडी कैलासचं शूट झालं होतं आणि माझं स्टार्ट होणार होतं. पण, मला त्यातले काही शब्द माहितच नव्हते. मी माझ्या दिग्दर्शकांना सांगितलं की मला अर्धा तास द्या, मला हे शब्द कळत नाहीयेत", असं सायली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "कारण कोल्हापुरी भाषा बोलायची एक ढब आहे. ती पुण्या-मुंबईसारखी बोलली जात नाही. पण माझ्या दिग्दर्शकाने खूप मदत केली. आणि, मी जिथे शूट केलं ते कुटुंबही कोल्हापुरी होतं त्यांनी पण मला खूप मदत केली. तिथल्या मुलीही 'मी जातो, मी खातो' असं बोलतात. म्हणजे कोल्हापुरी भाषेत जो रांगडेपणा आहे. तो त्यांच्यात आहे. आणि, अशा प्रकारे माझा कोल्हापुरी भाषेशी संपर्क आला."

टॅग्स :सिनेमामराठी अभिनेतासेलिब्रिटी