सविता मालपेकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सविता यांना आपण आजवर काकस्पर्श, मुळशी पॅटर्न, गोष्ट एका पैठणीची, मी शिवाजी पार्क अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सविता मालपेकर त्यांच्या रोखठोक आणि बिनधास्त स्वभावामुळे कायमच चर्चेत असतात. सविता यांनी नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांना दिलेला आयुष्यभराचा धडा सांगितला.
१०० व्या प्रयोगाची पार्टी अन्...
'डार्लिंग डार्लिंग' नाटकाच्या १०० व्या प्रयोगाची पार्टी होती. दादरला सिटीलाईट थिएटरसमोर एक नीलम नावाचं हॉटेल होतं. त्या हॉटेलला पार्टी ठेवली होती. सविता मालपेकर या पार्टीसाठी खास चायनीझ पार्लरमध्ये जाऊन तयार होऊन पार्टीला आल्या. नाटकाचे लेखक मधुसुदन कालेलकर, दिग्दर्शक अरविंद देशपांडे आणि सर्व कलाकार एकत्र आले होते. त्यावेळी सविता मालपेकर यांना अशोक सराफ यांनी दिलेली आयुष्यभर लक्षात राहणारी शिकवण त्यांनी सांगितली.
सविता मालपेकर दारुचा ग्लास उचलणार तोच...
सविता मालपेकर मुलाखतीत म्हणाल्या की, "सगळ्यांसमोर ड्रिंक्सचे ग्लास आले. मी आपली सगळ्यांकडे बघतेय. सगळे ग्लास घेतायत तर याने काय होणारेय हे कोणाला माहिती. सांगणारंही असं कोणी नाहीये की या गोष्टीपासून असं असं होईल. फक्त अशोकने माझ्याकडे डोळे मोठे केले आणि मान हलवली. म्हटलं काहीतरी गडबड आहे. मी हातच नाही लावला मग. मग त्यानंतर अशोकने मला सांगितलं की या इंडस्ट्रीत तुला राहायचं असेल. जे ध्येय घेऊन आलीयस तू. जिथे तुला पोहचायचंय अन् तिथे पोहचायचं असेल तर हे जे मोहमय आणि या गोष्टी आहेत ना त्याच्यापासून लांब रहा. म्हणजे जे ठरवून आलीयस ते करशील आणि तुला करता येईल."