मराठी कलाविश्वातील मोस्ट ग्लॅमरस आणि ब्युटी विथ ब्रेन असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे (Shruti Marathe). दमदार अभिनयशैली आणि सौंदर्या यांच्या जोरावर श्रुतीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर तिने साऊथ इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिथेही तिचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतो. परंतु, दोन्ही सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला एकेकाळी मराठी कलाविश्वात काम मिळेनासं झालं होतं. एका मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं आहे.
श्रुतीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात तिचा सनई चौघडे हा सिनेमा चांगला गाजला. मात्र, हा सिनेमा गाजल्यानंतरही तिला मराठीत हवं तसं काम मिळालं नाही. परिणामी, तिने तिचा मोर्चा साऊथ सिनेमांकडे वळवला. विशेष म्हणजे साऊथमध्ये गेल्यानंतर श्रुतीचं मराठीतलं काम पूर्णपणे बंद झालं होतं. एकीकडे साऊथमध्ये श्रुतीची लोकप्रियता वाढत होती. मात्र, भाषेचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे तिला त्या इंडस्ट्रीमध्ये समरसून घ्यायला त्रास होत होता. याच काळात तिचे मराठीचे दरवाजेही बंद झाले होते.
श्रुतीला मिळत नव्हतं मराठी सिनेमात काम
एका मुलाखतीमध्ये श्रुतीने याविषयी किस्सा सांगितला. साऊथमध्ये न रमल्यामुळे श्रुतीने तिचा मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला. परंतु, येथेही एक गोंधळ झाला. आता श्रुती साऊथमध्ये काम करते त्यामुळे तिला मराठी कलाविश्वात इंटरेस्ट नाही असं परस्पर ठरवत लोकांनी तिला ऑफर देणं बंद केलं होतं.
अशी झाली पुन्हा मराठीत एन्ट्री
श्रुतीला मराठीत तिचं स्थान निर्माण करायला पुन्हा स्ट्रगल करावा लागला. सुरुवातीचे एक-दोन वर्ष गेल्यानंतर तिच्या आयुष्यात राधा ही बावरी ही मालिका आली. ही मालिका तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेनंतर श्रुतीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि तसतशा तिच्याकडे कामाच्या ऑफर्सही येऊ लागल्या.
दरम्यान, श्रुतीने मुंबई पुणे मुंबई २, बंध नायलॉनचे, सनईचौघडे, रमा माधव या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, राधा ही बावरी ही तिची मालिका विशेष गाजली. या मालिकेमधूनच तिची मराठी कलाविश्वात खरी ओळख निर्माण झाली. मराठीसह श्रुतीने तमिळमध्ये ४ आणि कन्नडमध्ये १ सिनेमा केला आहे. श्रुती एक उत्तम डान्सर आहे. तसंच तिने कराटेचंही प्रशिक्षण घेतलं आहे.