Shubhangi Gokhale : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर अजूनही दबदबा कायम आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदानासह बरेच मराठी कलाकार देखील झळकले आहेत. अशातच 'छावा' चित्रपटात 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी देखील झळकला आहे. चित्रपटात गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिका सिनेमात अनुक्रमे सारंग साठ्ये व सुव्रत जोशी यांनी साकारल्या आहेत. या सिनेमामुळे हे कलाकार चर्चेत आहेत. अलिकडेच माध्यमांसोबत संवाद साधताना सुव्रत जोशीने 'छावा'मध्ये केलेल्या कामाचं सासूबाई शुंभांगी गोखले यांनी कौतुक केलं आहे.
अलिकडेच अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी 'टेली गप्पा' या युट्यूब चॅनेलसोबत खास बातचीत केली. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, हल्ली 'छावा' चित्रपट रिलीज झाला आहे आणि सुव्रत या चित्रपटाचा एक भाग आहे त्याबद्दल काय सांगाल. त्यादरम्यान जावई सुव्रत जोशीबद्दल त्या म्हणाल्या, "खूप अभिमान वाटतो. कारण, सुव्रत एक उत्तम नट आहेच आणि तो आणखी मोठ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना कळणार. चित्रपटात त्याचा निगेटिव्ह रोल आहे. सारंग आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो, चीड येते. हेच त्यांचं यश आहे आणि त्या दोघांनी ते करणं खूप महत्वाचं होतं." पुढे त्या म्हणाल्या,"छावा' चित्रपट लक्ष्मण उतेकरांनी खूप कष्ट घेऊन केला आहे. त्यामुळे 'छावा' लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे." अशी प्रतिक्रिया शुभांगी गोखले यांनी दिली.
दरम्यान, १४ फेब्रुवारीला 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवपासून 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये आणि आस्ताद काळे, शुभंकर एकबोटे हे मराठमोळे चेहरे या चित्रपटात पाहायला मिळत आहेत. याशिवाय त्यांच्या कामाचं सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे.