मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार सध्या अभिनयाव्यतिरिक्त व्यवसाय सुरु करण्यावरही भर देत आहेत. प्राजक्ता माळीने ज्वेलरी ब्रँड 'प्राजक्तराज' सुरु केला, तर भगरे गुरुजींची लेक अनघा अतुलने पुण्यात स्वत:चं हॉटेल सुरु केलं. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिचा स्वत:चा 'नखरेल' हा नेल आर्टचा व्यवसाय सुरु केला. नुकतंच अभिनेत्री सिया पाटीलने (Siyaa Patil) तर तिचा तिसरा व्यवसाय सुरु केल्याची बातमी दसऱ्याच्या मुहुर्तावर सर्वांसोबत शेअर केली आहे.
'रंगीले फंटर' या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमात सिया पाटीलने भूमिका साकारली. सिया अभिनयाव्यतिरिक्त यशस्वी उद्योजिकाही आहे. तिने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे 'S sense salon and spa' सुरु केले होते. यानंतर तिने 'गावcurry' चव महाराष्ट्राची आणि 'तवस' हे हॉटेलही सुरु केले. आता तिने दसऱ्याच्या मुहुर्तावर तिसऱ्या हॉटेलची घोषणा केली आहे. अंधेरीत तिने 'Brunch Baron Cafeteria' सुरु केले आहे. याची एक झलक तिने सोशल मीडियावरुन दाखवली.
सिया पाटील अतिशय गरीब परिस्थितीतून वर आली आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत तिने शिक्षण पूर्ण केले. तिने पेट्रोलपंपावरही काम केले आहे. असा बराच संघर्ष करत तिने अभिनयात पदार्पण केले. मात्र केवळ अभिनयावर अवलंबून न राहता तिने अनेक व्यवसायही सुरु केले. सिया लवकरच 'डोंबिवली रिटर्न' या बॉलिवूड सिनेमात ती संदीप कुलकर्णींसोबत दिसली होती. या नवीन कॅफेसाठी अनेक कलाकरांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.