मराठी कलाविश्वातील आजच्या घडीला असंख्य कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, असे काही मोजके कलाकार आहेत त्यांची या सिनेसृष्टीत त्यांचे पाय घट्ट रोवून ठेवले आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) . कसदार अभिनयशैली आणि उत्तम व्यक्तीमत्त्व असलेली सोनाली आज मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनाली सोशल मीडियावरही सक्रीय असून अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सोनाली एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचं बालपण सर्वसामान्य मुलांप्रमाणेच गेलं आहे. म्हणूनच एका तुटलेल्या चप्पलवरुन तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ही आठवण तिने नेटकऱ्यांसोबत शेअर केली आहे.
"लहानपणी माझ्या चपला सतत तुटायच्या.. त्यामुळे महादेव मंदीराच्या पुढे आमचे जे चांभार होते, त्यांच्याकडे सायकल थांबवून मी नेहमी जायचे.. ते त्यांच्या दाभणासारख्या सुईनी टाके घालून द्यायचे किंवा खिळा मारून दुरूस्त करून द्यायचे. आता अति टिकाऊ पादत्राणं असतात.. तुटतबिटत नाहीतच ! पण सुदैवानं परवा कावेरीची चप्पल तुटली आणि आमची जोडगोळी चांभार शोधत निघाली.. आमच्या पुण्याच्या घराच्या अलिकडेच त्यांची गाठ पडली. कावेरी तन्मयतेनं त्यांचं काम बघत बसली होती.. मला किती आणि का बरं वाटलं.. हे मला शोधायचंही नाहीए.. नंतर तिला घेऊन ह्या बसस्टॅापवर बसले ५ मिनिटं- कुठल्याच बसची वाट न पाहता.. मग काहीतरी कळलं मला - जपता येतं खोल आतलं वाटणं.. सारखं भरून आलं तर कसं चालेल बरं", असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, सोनाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी आणि अन्य भाषांमध्येही काम केलं आहे. विशेष म्हणजे सोनालीने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर काही पुरस्कारदेखील पटकावले आहेत.