आज कलाविश्वात असंख्य कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. परंतु, आज स्टारडम, प्रसिद्ध मिळवणाऱ्या प्रत्येक कलाकाराने इंडस्ट्रीत येणाऱ्यापूर्वी प्रचंड स्ट्रगल केला आहे. इतकंच नाही तर काही कलाकार आजही स्ट्रगल करत आहेत. यात खासकरुन दुय्यम फळीतील कलाकारांना अनेकदा आर्थिक संकटांना समोरं जावं लागतं. कारण, एखाद्यावेळी इंडस्ट्रीत काम मिळालं नाही तर घरखर्च चालवणं त्यांना कठीण होतं. त्यामुळे यात असेही काही कलाकार आहेत जे इंडस्ट्रीसोबतच अन्य ठिकाणीही लहानमोठी काम करु घर चालवतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मराठी अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
मराठी कलाविश्वातील अभिनेता अतुल वीरकर सध्या चर्चेत आला आहे. मुलाच्या आजारपणाचा खर्च करता यावा, घरखर्च चालवता यावा यासाठी त्याने चक्क एक फूड ट्रक सुरु केला आहे. 'सेलिब्रिटीज चायवाले' असं त्याच्या फूड ट्रकचं नाव आहे. नुकतंच त्याच्या या स्टार्टअपला अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी भेट दिली.
अतुल यांच्या मुलाला प्रियांशला एक गंभीर आजार झाला आहे. प्रियांश सध्या 'अलन हार्नडन ड्युडली सिन्ड्रोम' या दुर्मिळ आजाराचा सामना करतोय. त्याला सुरुवातीला फिट्स येणं, वजन कमी असणं अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर हार्मोनल असंतुलित असल्यामुळे त्याचा त्याच्या शरीरावर ताबा राहत नाही. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी वर्षभरात किमान १० लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे इतकी रक्कम दरवेळी उभी करणं अतुल यांना शक्य नाही. त्यामुळेच च्यांनी सेलिब्रिटी फूड ट्रक सुरु केलं आहे. या फूड ट्रकला सुप्रिया पाठारे यांनी भेट दिली असून त्यावर इडली, डोसा असा छान घरगुती नाश्ता केला.
दरम्यान, अतुल वीरकर यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. 'वृंदावन', 'लेक लाडकी', 'मालवणी डेज', 'वहिनीसाहेब', 'कुलवधू' या मराठी मालिकांमध्ये ते झळकले होते. इतकंच नाही तर त्यांनी 'हरि ओम विठ्ठल', 'बंड्या आणि बेबी', 'टाटा बिर्ला आणि लैला', 'स सासूचा' या मराठी सिनेमात काम केलं आहे . सोबतच ते 'पवित्र रिश्ता', 'लापतागंज' या हिंदी मालिकांमध्ये दिसले आहेत.