तेजश्री प्रधान हा टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री सध्या 'प्रेमाची गोष्ट'मधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मालिकेत ठसा उमटवल्यानंतर तेजश्री सिनेमांतही झळकली. आता 'लोकशाही' या नव्या चित्रपटातून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच लोकशाही चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून 'लोकशाही' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. सिनेमाचं पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमातून घराणेशाहीतला सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. माणसाची पैशांप्रती भूक भागली की त्याच्या लोभेची धाव सत्तेकडे गतिमान होते.घराणेशाहीतला सत्ता संघर्ष हा मिळालेला लाभ की शास्वत शाप आहे? असा प्रश्न या सिनेमातून उपस्थित केला गेला आहे. तेजश्री प्रधानसोबत 'लोकशाही' सिनेमात भार्गवी चिरमुले, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मोहन आगाशे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सिनेमाची निर्मितीची बाजू सांभाळली आहे. तर संजय अमर यांनी लोकशाही सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा 'लोकशाही' चित्रपट ९ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'लोकशाही' चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे. “आपण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही अस्तित्वात असताना त्याला ठेच पोहचवणाऱ्या राजकारण्यांचं आणि त्यांच्या भ्रष्ट राजकारणाचं वास्तव प्रखरपणे सांगणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाला नक्कीच तूफान प्रतिसाद मिळेल याची आम्हाला शास्वती आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.