Join us

"मनसे-भाजपा युतीला पुरंदरच्या तहाची उपमा?" तेजस्विनीवर का संतापले नेटकरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:53 PM

"पुरंदरचा तह" म्हणत तेजस्विनीने राज ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी केली तुलना? संतापले नेटकरी

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याची राजकीय वर्तृळात चर्चा रंगली आहे. दिल्लीतील अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे राज्यातील काही भाजपाच्या नेत्यांनाही भेटले. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत राज ठाकरे महायुतीबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेल्या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून समाजातील घडामोडींवर अगदी बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. तेजस्विनीने अगदी उघडपणे अनेकदा राज ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे. आतादेखील या राजकीय घडामोडींवर ट्वीट करत तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाचा दाखला दिला आहे. "पुरंदरचा तह...पण, राजावर विश्वास कायम!!" असं ट्वीट तेजस्विनीने केलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे नेटकरी संतापले असून राज ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी तुलना केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

"हे नाही पटलं", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "तुलना कोणासोबत? नाही पटलं...याला तह नाही तर नांगी टाकणं म्हणतात", असं म्हटलं आहे.

"अहो ताई तुमच्या साहेबांच्या राजकारनाला आमच्या राज्याच्या निर्णय सोबत compare करू नका कुठे ते 1-2 लोकसभा जागेसाठी दिल्लीपुढे लोटांगण घालणारे तुमचे साहेब आणि कुठे शिवछत्रपती", असंही म्हटलं आहे.

"अवघड आहे एकूणच! मनसे भाजप युतीला पुरंदरच्या तहाची उपमा? एवढंच दुःख होत असेल तर सोडा पक्ष किंवा परावृत्त करा तुमच्या राजाला,"  अशा अनेक कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, तेजस्विनीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून स्वत:चा ठसा उमटवला. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'एकदा येऊन तर बघा' या विनोदी चित्रपटात ती दिसली होती. अभिनेत्रीबरोबरच तेजस्विनीने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरेमनसेछत्रपती शिवाजी महाराज