केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी मनसेकडून ठिकठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहेत. आता काही मराठी सेलिब्रिटींनीही सरकारच्या या निर्णयाबाबत त्यांचं मत मांडलं आहे.
मराठी अभिनेता हेमंत ढोमेने ट्वीट करत हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यासंदर्भात X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. तेजस्विनीने या ट्वीटमध्ये डॉ. तारा भवाळकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. "भाषा ही जैविक गोष्ट असते, ती बोलली तरच ती जिवंत राहते 🧡 डॉ तारा भवाळकर यांचा मराठी भाषेविषयी संक्षिप्त पण माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. जगभराच्या व्यवहारासाठी इंग्रजी, देशभराच्या व्यवहारासाठी हिंदी आणि महाराष्ट्रात निर्विवाद मराठीच ! कुठल्याही भाषेला विरोध नाही, सक्तीला आहे", असं तिने म्हटलं आहे.
तेजस्विनी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. समाजातील घडामोडींवर ती कायमच निर्भिडपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते. अनेकदा तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकांना उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. आता हिंदी भाषा सक्तीवरुनही तिने तिचं मत व्यक्त केलं आहे.