महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळासह सामान्यांमध्ये या एकाच घटनेची चर्चा रंगली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण याविषयी भाष्य करत आहेत. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) हिनेदेखील याविषयी ट्विट करुन तिचं मत मांडलं आहे. तेजस्विनीचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली तेजस्विनीने सध्या एका पाठोपाठ एक असे दोन ट्विट केले आहेत. यात पहिल्या ट्विटमध्ये तिने महाराष्ट्रात सर्वोत्तम भेळ मिळते असं म्हटलं आहे. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये तिने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असं म्हटलं आहे. त्यामुळे तेजस्विनीचे हे दोन्ही ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय आहे तेजस्विनीचं पहिलं ट्विट
“भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!” असं ट्विट तेजस्विनीने केलं आहे. सोबतच तिने Maharashtrapolitics हा हॅशटॅगही वापरला आहे. तिच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट केल्या आहेत. लोकशाही फक्त नावापूरतीच, बाकी सालटं काढायचं काम सुरूच राहील, असं एका युजरने म्हटलंय.
काय आहे तेजस्विनीचं दुसरं ट्विट
या ट्विटमध्ये तेजस्विनीने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असं म्हटलं आहे. "तत्वनिष्ट, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर “ राज” करावं !!! - महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक महाराष्ट्रआतातरीजागाहो", असं दुसरं ट्विट तिने केलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार,छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ,अनिल भाईदास पाटील,आदिती तटकरे, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम, हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.