अभिनेत्री उर्मिला कोठारेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. शूटिंगवरुन घरी येत असताना उर्मिलाच्या कारचा हा भयानक अपघात झाला. मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर या मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडला. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
शुक्रवारी(२७ डिसेंबर) रात्री १ वाजताच्या सुमारास उर्मिला शूटिंगवरुन घरी येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही गंभीर जखमी झाले आहेत. गाडीतील एअर बॅग्समुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचल्याची माहिती मिळत आहे. त्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात उर्मिलाच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.
उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. शुभमंगल सावधान, काकण, ती सध्या काय करते, दुनियादारी, गुरू अशा अनेक सिनेमांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. उर्मिलाने २०११ साली आदिनाथ कोठारेशी लग्न केलं. त्यांना जीजा ही मुलगी आहे.