प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आईचा मोठा वाटा असतो. अगदी बाळ पोटात असल्यापासून ती माऊली त्याच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करत असते. इतकंच नाही तर मूल कितीही मोठं झालं अगदी साठीला पोहोचलं तरी प्रत्येक आईसाठी तिचं बाळ लहानच असतं. त्यामुळेच आयुष्यभर आपल्यासाठी खस्ता खाणारी, वेळप्रसंगी उपाशी राहणारी, सतत आपला विचार करणाऱ्या माऊली प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा दिवस म्हणजे मदर्स डे. आज सगळीकडे मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मात्र, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने तिचा स्वत:चा पहिला मदर्स डे सेलिब्रेट केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली उर्मिला कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने तिचा आई झाल्यानंतरचा एक्स्पिरिअन्स शेअर केला आहे. सोबतच तिच्या बाळासोबतचे काही गोड फोटोही शेअर केले आहेत.
It’s my first Mother’s Day..कसं वाटतं आईपण उर्मिला? सतत आनंदात असूनही मात्र, रोजचा दिवस परिक्षा असल्यासारखं, अशी कॅप्शन देत तिने एका वाक्यात तिच्या आईपणाचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच तिने तिच्या बाळासोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहे.
दरम्यान, उर्मिला निंबाळकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठीसह अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच उर्मिलाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तिच्या बाळाचं नाव अथांग असून ती कायम त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.