मराठी कलाविश्वातील दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजे वंदना गुप्ते ( vandana gupte). आजवरच्या कारकिर्दीमध्ये वंदना गुप्ते यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा,मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे कलाविश्वात त्यांचा दांडगा वावर असल्याचं पाहायला मिळत. लवकरच त्यांचा बाईपण भारी देवा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे सध्या त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. यामध्येच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचं शिक्षण कशाप्रकारे पूर्ण केलं हे सांगितलं.
वंदना गुप्ते यांनी या मुलाखतीमध्ये त्यांच्या सिनेमासह वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. यात आवड जोपासून मुलाचं शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता आलं हे त्यांनी सांगितलं.
'तुमची अशी कोणती इच्छा आहे जी कामाच्या गडबडीत राहून गेलीये? आणि राहिलेली कोणती इच्छा तुम्हाला आता पूर्ण करायला आवडेल?', असा प्रश्न वंदना गुप्ते यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी त्यांच्या आवडीविषयी सांगितलं. "मी प्रत्येक टप्प्यावर थांबत माझ्या इच्छा पूर्ण केल्या. मला फॅशन डिझायनिंगची आवड होती त्यामुळे मी अभिनयातून २ वर्ष ब्रेक घेतला आणि माझी हौस, इच्छा पूर्ण केली. यातून मी पैसे सुद्धा कमावले", असं वंदना गुप्ते म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "फॅशन डिझायनिंग करत असताना मी माझे ड्रेस विकले. आणि , त्या कमाईतून अमेरिकमध्ये शिकत असलेल्या माझ्या मुलाची एक वर्षाची फी सुद्धा भरली. हौस पूर्ण झाली आणि मग मी पुन्हा माझ्या कामाला लागले. प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन काही ना काही केलं पाहिजे. जर काही केलच नाही तर आपण म्हातारे होऊन जाऊ. त्यामुळे नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत."
दरम्यान, वंदना गुप्ते यांची मुख्य भूमिका असलेला बाईपण भारी देवा हा सिनेमा येत्या ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दिपा परब-चौधरी, शिल्पा तुळसकर, सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री झळकणार आहेत.