सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याच मालिका, चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या मालिका छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. महाभारत ही प्रेक्षकांची आवडती मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत. या मालिकेत आपल्याला उत्तराच्या भूमिकेत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना पाहायला मिळत आहे.
वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला महाभारत या मालिकेत काम केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी त्यांची गणना व्हायची. मराठीसह हिंदी आणि राजस्थानी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी त्यांचा अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. आज त्या खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी आजही त्यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.
वर्षा उसगांवकर चित्रपटात खूपच कमी काम करत असल्या तरी त्या अनेक समारंभात, पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका कोंकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकामध्ये देखील काम केले होते. वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.
गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे वर्षा उसगांवकर यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.