मराठी कलाविश्वातील एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar). उत्तम अभिनयशैलीमुळे मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर अक्षरश: राज्य केलं. विशेष म्हणजे आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. मराठी, हिंदी आणि राजस्थानी सिनेमांमध्ये काम केलेल्या वर्षा यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. त्यामुळे त्या सातत्याने चाहत्यांच्या चर्चेत येत असतात. यामध्येच सध्या त्यांची एक जुनी मुलाखत चर्चिली जात आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या शांत स्वभावाविषयी भाष्य केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर वर्षा उसगांवकर यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. त्यांची ही मुलाखत दिवंगत अभिनेता विक्रम गोखले यांनी घेतली होती. या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरपासून ते वैयक्तिक जीवनापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
"शाळेत असताना मी फार लाजरीबुजरी होती. आजही एखाद्या पार्टीत गेल्यावर मी एकटं पडते. कारण, मी फार अशी बोलकी नाहीये. पण, मी खऱ्या अर्थाने तेव्हा बोलकी झाले ज्यावेळी मी मोठी झेप घेतली. त्यामुळे आपल्या स्टोरीचा असा एक सरळ आलेख तयार करता येत नाही", असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.पुढे त्या म्हणतात, "माझे वडील म्हणजे धीरगंभीर व्यक्तीमत्त्व. त्यांची कायम मला भीती वाटायची.कारण, त्यांनी कधीही मला पाहिलं की, अभ्यास केल्यास, गणितात किती मार्क मिळाले. म्हणजे ते कायम मला असेच प्रश्न विचारायचे. यात टिकली का लावली नाही, बांगड्या का घातल्या नाहीत हे पण प्रश्न विचारायचे. त्यामुळे मला कायम असं वाटायचं ते जिथे कुठे आहेत तिथे नीट असावेत पण घरी नसावेत.''
दरम्यान, या मुलाखतीमध्ये वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फिल्मी करिअरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 'गंमत जंमत', 'आमच्यासारखे आम्हीच', 'जमलं हो जमलं', 'मज्जाच मज्जा', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'शेजारी शेजारी', 'हमाल दे धमाल','साथी', 'तिरंगा', 'बेनाम', 'शोहरत' अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या त्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.