आसाम-मिझोराम सीमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत. त्यात जखमी झालेले महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर यांना मुंबईत आणण्यात आले आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे भाऊ आहेत. आपल्या भावाला गोळी लागले हे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. नुकतीच उर्मिलाने आपल्या भावासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व भारतवासियांचे आभार मानले आहेत.
उर्मिला निंबाळकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, सगळे उत्तम चालू असताना सकारात्मक राहणे, प्रार्थना म्हणणे वेगळे आणि ‘वैभवला गोळी लागलीय’ हे वाक्य ऐकायला मिळाल्यानंतर, ‘सगळं नीट होणार’ हा विचार मनात येणं वेगळं! काय झालं, कुठुन झालं, कोणत्या मशिन गननं झालं सगळं दिड दिवसांत एवढ्यावेळा कानावर आलंय पण खरं सांगु, मला आणि माझ्या घरच्यांना फक्त तो सुखरुप असावा, एवढीच आशा लागून राहिली होती. त्यात माझे प्रेग्नन्सीचे ९ महिने पु्र्ण झाल्यामुळे आता कधीही हॅास्पिटल गाठावं लागणार असल्यामुळे, मला ही बातमी सगळ्यात शेवटी सांगण्यात आली. बाळांनाही आपण पॅनिक झालेलो कळतो आणि तेही मग पॅनिक होतात.