ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला सुन्न करणारी घटना १० सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरात (Mumbai Rape Case) घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात अभिनेत्री हेमांगी कवीनेही (hemangi kavi) तिच्या भावनांना वाट मोकळी केली असून पुन्हा एकदा समाजात स्त्रीलाच दोषी ठरवलं जाईल असं म्हटलं आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्त्रियांच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. कोणतीही घटना घडली की आरोपीपेक्षा स्त्रियांनाच अनेक प्रश्नांचा जाब विचारला जातो, हेच तिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
"आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, single होती, divorcee होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार! चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?", अशा शब्दांत हेमांगीने तिच्या भावनांना वाट मोकळी केली आहे.
काय आहे प्रकरण?
९ वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश सुन्न झाला होता. एका तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता. यावेळी त्या नराधमांनी तिची केलेली अवस्था पाहून संपूर्ण देश हळहळला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली. एका महिलेवर बलात्कार करून आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात क्रूरपणे गंभीर जखमा केल्या. या घटनेची माहिती मिळताच पीडितेला गंभीर अवस्थेत असताना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. या प्रकरणानंतर आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी अटक केली असून त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहन चौहान बा मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आहे.