Join us  

ऑगस्टमध्ये मराठीचे मैदान मोकळे, 'धर्मवीर २'ची तारीख बदलल्याने ३ आठवडे मराठी चित्रपट नाहीत

By संजय घावरे | Published: July 27, 2024 10:17 PM

Marathi Cinema: धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारलेल्या 'धर्मवीर २' चित्रपटाकडून मराठी सिनेसृष्टीला खूप आशा असताना प्रदर्शनाची तारीख बदलल्याने इतर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचीही गणिते बदलली आहेत. 'धर्मवीर २' पुढे गेल्याने ऑगस्टमध्ये मराठीचे मैदान मोकळेच राहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

- संजय घावरे 

मुंबई - धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारलेल्या 'धर्मवीर २' चित्रपटाकडून मराठी सिनेसृष्टीला खूप आशा असताना प्रदर्शनाची तारीख बदलल्याने इतर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचीही गणिते बदलली आहेत. 'धर्मवीर २' पुढे गेल्याने ऑगस्टमध्ये मराठीचे मैदान मोकळेच राहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

मोठ्या थाटात 'धर्मवीर २' चित्रपटाचा मराठी-हिंदी भाषेतील ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलरला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, पण राज्यातील पूर परिस्थितीमुळे 'धर्मवीर २' ९ ऑगस्टला रिलीज होणार नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. यामुळे इतर मराठी चित्रपटांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ९ ऑगस्टला 'धर्मवीर २' असल्याने १६ आणि २३ ऑगस्टला एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नव्हता. २ ऑगस्टला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'मुक्ताई' प्रदर्शित होणार असल्याचे अगोदर घोषित करण्यात आले होते, पण तांत्रिक कारणांमुळे 'मुक्ताई'ची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ९, १६ आणि २३ ऑगस्ट या तिन्ही तारखा रिकाम्या राहणार आहेत. एका चित्रपटामुळे इतर मराठी चित्रपटांची गणिते बदलली आहेत.

'धर्मवीर' पुढे गेल्यानंतरही 'मुक्ताई' ठरलेल्या तारखेला प्रदर्शित करणे जमणार नसल्याचे दिग्पालने 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. दिग्पाल म्हणाला की, 'मुक्ताई'चे काम बाकी असल्याने तारीख बदलली होती. व्हिएफएक्सवर काम सुरू आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींवरील हा चित्रपट वर्ल्ड क्लास बनवायचा आहे. 'मुक्ताई'च्या रूपात हॅालिवूडचा सिनेमा मराठीत बघायला मिळेल. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करून त्यानंतर प्रदर्शनाची योजना आखण्यात येईल असेही दिग्पाल म्हणाला.

'आधी जनजीवन, मग मनोरंजन''धर्मवीर २'ची नवीन तारीख दोन दिवसांमध्ये घोषित करणार असल्याचे सांगत निर्माता-अभिनेता मंगेश देसाई म्हणाला की, महाराष्ट्रातील पूर परिस्थिती पाहून मन हेलावून गेले. 'धर्मवीर २'च्या प्रमोशनचे प्लॅनिंग करताना असे लक्षात आले की जिथे मराठी माणसे आहेत, जिथे धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना पोहोचवायचे आहे त्या ठिकाणच्या नागरिकांच्या घरात आज पाणी आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज त्यांनी स्वत:ला सावरणे गरजेचे आहे की सिनेमा बघणे याचा विचार करून हा निर्णय घेतला. त्यांचे जीवन पूर्वपदावर आल्यावर मनोरंजन करू. आता गणेशोत्सवानंतर चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यताही मंगेशने वर्तवली.

मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्वागतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा 'धर्मवीर २'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय सांगितला, तेव्हा त्यांनी योग्य निर्णय असल्याचे म्हटले. पुढील आठवडाभर धो-धो पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत प्रवीण तरडेसोबत मी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मुख्यंमंत्र्यांनी म्हटल्याचे मंगेशने सांगितले.

या चित्रपटांना फायदा२ ऑगस्टला अशोक सराफ अभिनीत 'लाइफलाईन' आणि अंकित मोहनचा 'बाबू' हे दोन वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'धर्मवीर २' पुढे गेल्याचा फायदा यांना होणार आहे.

हिंदीचेही आव्हान१५ ऑगस्टला 'स्त्री २', 'वेदा', 'खेल खेल में' आणि 'डबल इस्मार्ट' हे चार हिंदी चित्रपट येणार असले तरी अगोदरच्या आठवड्यात आलेल्या दोन चित्रपटांचे पर्याय मराठी रसिकांसाठी खुले राहतील.

टॅग्स :मराठी चित्रपट