गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आहे. वैशाली सामंतने आतापर्यंत विविध भाषेतील गाणी गायली आहेत. दरम्यान आता वैशालीने राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र(Saavani Ravindra)च्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी वैशाली सामंतने बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. तसेच मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेन्शन...सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, अशी खंत तिने या पॉडकास्टमध्ये व्यक्त केली आहे.
गायिका सावनी रविंद्रने म्युझिक पॉडकास्ट सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलते केले आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. सावनीने आपल्या मराठी संगीतसृष्टीत काय बदल हवे आहेत असे वैशाली सामंतला विचारल्यावर ती म्हणाली की, ''सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. आपल्या कलाकारांना पीएफ मिळतो का तर नाही, पेन्शन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे फायदे योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल.''
''आता समुद्रमंथनाची वेळ आलीय- वैशाली सामंत''
ती पुढे म्हणाले की, ''आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडेसे सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालावे. सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्यायला हवा, त्याचा संपूर्ण आढावा देखील घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपली स्पर्धा ही मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवे. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.'' असे म्हणत वैशाली सामंतने सरकारकडे मदत मागितली आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणे गरजेचे आहे.