कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर झाला असून अनेक रुग्णांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आता मराठी कलाकार कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
मराठी कलाकारांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे नाव महाकोविड असून महाराष्ट्र आणि कोविड असा दोन शब्दांचे मिळून महाकोविड हे नाव ठेवण्यात आले आहे. #mahacovid हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. कोरोना संदर्भात बेड, प्लाझ्मा, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सह कोणत्याही गोष्टी मिळण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कुणाला अडचण येत असेल तर आपली गरज #mahacovid या हॅशटॅगसह जोडायला विसरू नका असे आवाहन मराठी सेलिब्रेटींनी केले आहे.
स्वप्निल जोशीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून पुढील काही दिवस तो खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करणार नसून केवळ कोव्हिडबाबतची सकारात्मक बातमी वा त्याबद्दलच्या मदतीसंबंधीच्या बातम्या पोस्ट करणार आहे. mahacovid या हॅशटॅगचा वापर करून त्याने ही पोस्ट केली आहे.
स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, समीर विद्वांस, हेमंत ढोमे यांसारख्या सेलिब्रेटींंनी mahacovid हा हॅशटॅग वापरत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. आनंदी गोपाळ, डबलसीट आदी चित्रपटांचा दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ज्यांना लस विकत घेणं परवडणारं आहे. अशा लोकांनी ही लस मोफत न घेता विकत घ्यावी जेणेकरून याचा पैसा कोव्हिडच्या इतर कारणासाठी वापरता येईल.