माधुरी पवारने आपल्या डान्स आणि अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या लहानपणीचा एक खास किस्सा सांगितला आहे. तसेच मी कलाकार म्हणून जन्माला आलीय असं देखील म्हटलं आहे. "मी चौथीमध्ये असताना वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. तेव्हा मला डान्समध्ये भाग घ्यायचा होता. पण जर मला डान्स करायचा आहे तर मला चांगले कपडे पाहिजेत."
"मी माझ्या बाबांना सांगितलं की, पप्पा मला नाच रे मोरा या गाण्यावर डान्स करायचा आहे. पण माझ्याकडे ड्रेस नाही. मला खूप अभिमान वाटतोय हे सांगताना की, आपला बाप जेव्हा दुसऱ्यांच्या घराच्या विटा उचलत असतो आणि तो उचलत असताना त्याच्या अंगात एवढी धमक असते, आपलं बाळ जेव्हा काही म्हणते तेव्हा तो हो म्हणतो. माझे आई-वडील मला दुकानात घेऊन गेले. तिथे एक ड्रेस आवडला... त्या काळाच्या हिशोबाने तो थोडा महाग असेल. पण तरीही माझ्या वडिलांनी तो ड्रेस मला घेतला."
"माझ्या आईने मला छान मेकअप करून दिला. त्यानंतर मी छान डान्स केला. माझा पहिला फोटो हा पेपरमध्ये आला तेव्हा मी चौथीत होते. तेव्हाही वाक्य असं होतं की नृत्य सादर करताना माधुरी पवार आणि आताही मी वाचते नृत्य सादर करताना माधुरी पवार... म्हणून मी जन्मताच सेलिब्रिटी आहे. मी कलाकार म्हणून जन्माला आली आहे. माझ्या आयुष्याचं हे मोठं ध्येय आहे ज्याच्यासाठी मला जगायचं आहे. त्याच्यासाठी मला कितीही झगडावं लागलं तरी मी झगडत राहणार आहे आणि मी झगडत आली आहे" असं माधुरीने म्हटलं आहे.
माधुरी मुलाखतीत संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलली. यासोबत तिने 'रानबाजार' सीरिजमध्ये साकारलेल्या भुमिकेवरही भाष्य केलं. "रानबाजारमध्ये काही डायलॉग आहेत. पण, ती कथानकाची गरज आहे. हे जेव्हा माझ्या घरातले बघतात, तेव्हा ते माझी मजा घेतात. म्हणजे घरी एखादा कार्यक्रम असेल आणि सगळे एकत्र आले की ते मला रानबाजारमधील डायलॉग बोलायला सांगतात. माझ्या घरचे मला पाठिंबा देतात. त्यामुळे बोल्ड भुमिकांबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलला आहे" असं माधुरीने म्हटलं आहे.