Santosh Juvekar: मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमामुळे अभिनेता प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात त्याने साकारलेल्या रायाजी या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. याशिवाय चित्रपटातील त्याचा लूक सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. याचनिमित्ताने अभिनेता संतोष जुवेकर वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. या मुलाखतींमध्ये त्याने सांगितलेला 'छावा' चित्रपटात काम करण्याचा अनुभव किंवा शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से देखील चर्चेत आहेत. मात्र, आता संतोष जुवेकर हा एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
संतोषने नुकतीच 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने नुकतीच न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने एका चित्रपटाच्या अपयशानंतर आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा केला आहे. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "एकतारा सिनेमा चालला नाही तेव्हा मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो. त्यामुळे मी ड्रिंक करायला लागलो. मी सकाळी-सकाळी विजू मानेला फोन करायचो त्याचबरोबर अवधूतला फोन करायचो आणि रडायचो. त्यावर त्यांनी खूपदा माझी समजूत काढली. या गोष्ट मी खूप मनाला लावून घेतल्या होत्या."
पुढे अभिनेता म्हणाला, "मधल्या काळामध्ये असंच एका ठिकाणी मी गेलो असताना काही २-४ लोक माझ्याकडे आले. त्यानंतर ते माझ्यासोबत फोटो वगैरे काढू लागले. तुमचं काम आम्हाला आवडलं. तुमचा 'एकतारा' सिनेमा आम्ही पाहिला काय काम केलंय तुम्ही! असं ते म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकून मला वाटलं की, यार आपण इतकी मेहनत करुन इथपर्यंत आलोय. आपण अनेक सिनेमे, मालिका केल्या आहेत ज्यामुळे लोक आपल्याला ओळखतात. जर आपण केलेला एक सिनेमा नाही चालला म्हणून बाकीच्या गोष्टी मी विसरतोय का? असा विचार मी तेव्हा केला."
दरम्यान, संतोषसह 'छावा' या चित्रपटात मराठी कलाकारांची मोठी स्टारकास्ट आहे. नीलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर, मनोज कोल्हटकर, आशिष पाथोडे असे मराठी कलाकारांच सिनेमात प्रमुख भूमिका आहे.