Santosh Juvekar : हिंदी सिनेसृष्टीत बऱ्याच दिवसांपासून 'छावा' सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'छावा' हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, 'छावा'मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि साउथ क्वीन रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका आहे. याशिवाय चित्रपटात एक मराठमोळा चेहरा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर आहे. संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटात रायाजी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका व लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच 'छावा'च्या रिलीजच्या निमित्ताने संतोष जुवेकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
संतोष जुवेकरने 'छावा'च्या प्रदर्शनाच्या दिवशी सुंदर शब्दात पोस्ट लिहित इन्स्टाग्रामवर ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "राजा तो रयतेचा, वाली गोरगरिबांचा, रामही तोच शिवही तोच, तोच श्वास, तोच ध्यास अन् तोच सखाही या रायाजीचा!! राजं मुजरा....! तुम्हां सर्वांना "छावा दिनाच्या" शिवमय शुभेच्छा..., जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे...!" 'छावा' १४ फेब्रुवारीला रिलीज होतोय." अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा 'छावा' चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. आज बऱ्याच प्रतीक्षेनंतर १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये 'छावा' सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याची पाहायला मिळतेय.