Santosh Juvekar Post: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची (Vicky kaushal) मुख्य भूमिका असलेला 'छावा' या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा होताना दिसतेय. या चित्रपटात विकी कौशलसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) देखील पाहायला मिळते आहे. 'छावा' मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदानाने संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. दरम्यान, अलिकडेच 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी चांगलचं कौतुक केलं. परंतु चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला. चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या लेझिम नृत्याच्या सीनवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला. पण अखेर हा वाद आता थांबला असून चित्रपटातील लेझिम नृत्याचा सीन काढला जाणार असल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, 'छावा' चित्रपटात एक मराठमोळा चेहरा सुद्धा पाहायला मिळतोय. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. संतोष जुवेकरने 'छावा' मध्ये रायाजी ही भूमिका साकारली आहे. अशातच संतोष जुवेकरने सोशल मीडियावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं कौतुक करत खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "सरांनू अगदी बरोबर बोललात. आपलं राजं, रयतेच राजं आहेत, गोरगरिबांच राजं आहेत. आपलं राजं रयतेच्या दुःखात जसं सहभागी व्हायचे तसे त्यांच्या सुखातही नक्कीच सहभागी होत असतील. सर्वगुण संपन्न असे महान योद्धा आहेत ते."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "पण, तरीही तुम्ही तुमच्या भावनांना पाठी ठेऊन ज्यांना हे पसंत नाही त्यांच्या भावनांनाचा आदर ठेऊन जो निर्णय घेतलात त्यासाठी तुम्हाला सलाम! आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय...! छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...!" अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा 'छावा' हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.