Santosh Juvekar: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेत झळकणार आहे तर रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. याशिवाय 'छावा' मध्ये मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सुद्धा दिसणार आहे. संतोष जुवेकर या सिनेमात रायाजी ही भूमिका साकारणार आहे.
नुकताच संतोष जुवेकरने 'छावा'च्या शूटिंग दरम्यानचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रवासाची झलक त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे. ""छावा" चा रायाजी माझ्या राजांची सावली. जय भवानी, जय शिवराय... जय शंभूराजे...!" असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. संतोष जुवेकरचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. "अमेझिंग लूक...", "मस्तच...!" अशा प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, बहुप्रतीक्षित 'छावा' हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.