Join us

"चित्रा टॉकीजच्या बाहेर रस्त्यावर झोपलो आणि..." अभिनेता प्रसाद ओकने सांगितला कठीण काळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:25 PM

अभिनेता प्रसाद ओक सध्या 'धर्मवीर-२' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक सध्या 'धर्मवीर-२' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग चांगलाच गाजला. आता या चित्रपटाच्या सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अशातच अभिनेता या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे.

नुकतीच प्रसाद ओकने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "तेव्हा माझं लग्न झालंच नव्हत आणि मी एका ठिकाणी पीजी म्हणून राहत होतो. माझ्याकडे असलेली बाईक मी विकून तिथलं तीन महिन्यांच भाडं भरलं होतं. पण, तीन महिने झाले तरीही मला काम काही मिळालं नाही. त्या तीन महिन्याच्या भाड्यावर नवं कॉन्ट्रॅक होणार होतं. तर, त्या जागेच्या ज्या मालकीणबाई होत्या त्यांनी चार-पाच दिवस वाट बघितली. नंतर त्यांनी माझ्याकडे भाड्याचे पैसे मागितले, पण तेव्हा माझ्याकडे पैसे नसल्यामुळे घर खाली करावं लागलं. त्यावेळी पुण्याहून मुंबईला येताना  आणलेली प्लास्टिकची ब्रिफकेस आणि एक सुतळी लावलेली गादी घेऊन मी घराबाहेर पडलो". 

पुढे प्रसाद ओक म्हणाला, "त्यावेळी माझी एक मानलेली आत्या होती, ती माझगांवला राहत होती. तिचा फोन नंबर माझ्याकडे होता. बऱ्याचदा फोन करूनही तिने फोन काही उचलला नाही. तेव्हा आमच्या घरी देखील फोन नव्हता आमच्या वाड्यात तेव्हा ज्यांच्याकडे फोन होता त्यांची वेळ रात्रीची होती.त्यामुळे काय करावं सूचत नव्हत. मग मी बॅग घेतली आणि शिवाजी मंदिरच्या पाठीमागे गॅलरी आहे तिथे थांबलो. त्यानंतर पुन्हा रात्री मी आत्याला फोन केला तेव्हाही तसंच झालं. त्यानंतर पुन्हा शिवाजी मंदिरकडे गेलो. तेव्हा मी मुंबईत अगदीच नवखा होतो. मुंबई फिरणं मला माहितंच नव्हतं.  त्यावेळी चित्रा टॉकीजच्या बाहेरची सगळी दुकानं बंद झाली होती. परत मग तिथे मी बसलो आणि तसाच झोपलो. मला कळलंच नाही की मला कधी झोप लागली. जाग आली तेव्हा मध्यरात्री झाली होती. उठून पाहतो तर बॅग वगैरे सगळं व्यवस्थित होतं. मग तिथेच झोपी गेलो. तेव्हा खरंतर, माझी आत्या हैदराबादला गेली होती. तेव्हा मुळात ती घरी नव्हतीच. अखेर दोन दिवसानंतर ती पुन्हा मुंबईत परतली, तेव्हा मी तिला फोन केला.  त्यानंतर मी तिच्या घरी राहायला गेलो".

२७ सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या 'धर्मवीर २' सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून घेतलं आहे.  या सिनेमाचे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहेत. तर 'धर्मवीर २' पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत.

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटी