Join us  

"अमजद यांच्या आवाजात 'कितने आदमी थे'..." सचिन पिळगावकरांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:34 PM

'शोले' या हिंदी चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.

Sachin Pilgaonkar : 'शोले' या हिंदी चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यावेळेस हा चित्रपट बॉलिवूडला नवसंजीवनी देणारा ठरला. चित्रपटाचं कथानक त्यातील कलाकार आणि उत्तमरित्या केलेलं दिग्दर्शन या सर्व कारणांमुळे 'शोले' सुपरहिट ठरला. या चित्रपटामध्ये मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर देखील झळकले होते. त्यामध्ये त्यांनी अहमद नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. तेव्हा त्यांचं वय फक्त १७ वर्ष होतं. दरम्यान, या चित्रपटाप्रमाणे त्यातील कलाकार आणि त्यांचे डायलॉगही तेव्हा प्रचंड गाजले. 

'शोले' चित्रपटामध्ये अभिनेते अमजद खान 'गब्बर सिंग' या खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. त्यात अमजद खान यांनी म्हटलेला 'कितने आदमी थे'..." डायलॉग प्रत्येकाचा ओठावर असायचा. पण हा डायलॉग डबिंग करण्यात आला होता. नुकतीच सचिन पिळगावकरांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली.  या मुलाखतीत सचिन यांनी अनेक खुलासे केले. तेव्हा ते म्हणाले, "त्यावेळी सगळे सीन्स एकत्र केल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की अमजद यांचा आवाज हा 'गब्बर सिंग'चा आवाज वाटत नाही आहे. तो थोडासा पातळ वाटतोय, वरच्या सूराचा वाटतोय. त्यामुळे काही लोकांनी रमेशजींना सूचवलं की आपण दुसऱ्या कोणाकडून तरी डबिंग करून घेऊया. असं जर झालं तर अमजद यांचं करिअर संपलं असतं. आम्ही तेव्हा असं म्हणायचो की या चित्रपटानंतर ते सुपरस्टार होतील, ते झालं नसतं. तर तेव्हा मी रमेशजींना सांगितलं, की असं करू नका. त्यावर ते म्हणाले नाही, त्यांचा आवाज पातळ वाटतोय. मग मी रमेशजींना डबिंग करण्याचं सुचवलं. तेव्हा मी त्यांच्याकडे तीन दिवसांचा अवधी मागितला. एक सीन मी डबिंग करून दाखवतो असं त्यांना सांगितलं. त्यांनंतर तुमचा जो निर्णय असेल तो मान्य असेल, असं मी त्यांना म्हणालो". 

पुढे सचिन पिळगावकर म्हणाले, " तेव्हा अमजद खान यांना मी सांगितलं की होतं की सकाळी लवकर उठायचं. मी त्यांना सकाळी ५ वाजता घ्यायला जायचो. पुढे सकाळी ६ ते ७ या एक तासामध्ये आम्ही डबिंग करायचो. कारण सकाळी आवाजाचा  बेस असतो तो दिवसभरात कधीच नसतो. तेव्हा सकाळी उठल्यानंतर फक्त चहा घ्यायचा असं मी अमजद यांना सांगितलं होतं. शिवाय त्यावेळी डबिंग करताना वरच्या पट्टीत न बोलता खालच्या पट्टीत बोलायचं असा सल्ला दिला. आवाज न बदलता त्या पद्धतीत बोलण्यास सांगितलं. त्यानंतर मी पहिला डायलॉग "कितने आदमी थे..." म्हणायला सांगितला. मग सात वाजल्यानंतर पॅकअप करायचो असं करता करता तीन दिवस आम्ही एक-एक तास डब केला आणि मग तो सीन डब झाला". 

टॅग्स :सचिन पिळगांवकरअमजद खानबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीमराठी अभिनेता