Join us

VIDEO: ८५ वर्षीय आजोबांची भक्ती पाहून भारावला संदीप पाठक; म्हणाला- "समाधान या गोष्टीला प्राधान्य देणारी..."  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:49 IST

संदीप पाठक (Sandeep Pathak) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Sandeep Pathak: संदीप पाठक (Sandeep Pathak) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी कलाविश्वात संदीपला 'कॉमेडी किंग' म्हणून ओळखलं जातं. संदीपने त्याच्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान, सोशल मीडियावर संदीप पाठकचा भलामोठा चाहतावर्ग आहे. त्याद्वारे वेगवेगळे व्हिडीओ तसेच फोटो पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट्स देत असतो. नुकताच संदीपने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

नुकताच संदीप पाठकने सोशल मीडियावर एका ८५ वर्षीय आजोबांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे आजोबा सप्तशृंगी देवीच्या दर्शन घेण्यासाठी पायऱ्यांवरून चालत जात असताना अभिनेत्याने त्यांच्यासोबत संवाद साधला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीच्या गडावर महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही देवी उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी मानली जाते. अशातच ८५ वर्षीय आजोबा देवीच्या दर्शनासाठी आलेले पाहून अभिनेत्याने त्यांची विचारपूस केली. त्यांची सप्तशृंगी देवीवरची श्रद्धा पाहून अभिनेता भारावला आहे. १९६७ सालापासून हे आजोबा वर्षातून किमान ३-४ वेळा देवीच्या दर्शनासाठी गडावर पायी चालत जातात. या आजोबांची भक्ती पाहून नेटकऱ्यांनीही कौतुक केलं आहे. 

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संदीपने या आजोबांचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, " ८५ वर्षाचे तरूण आजोबा भेटले आणि खूप काही शिकवून गेले. आयुष्यात ही अशी माणसं भेटतात आणि आपल्या जगण्याला उर्जा व उर्मी देतात. समाधान या गोष्टीला प्राधान्य देणारी ही पिढी. नतमस्तक!" 

संदीपने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलंय, "जुनी माणसं ही शेवटची पिढी, जी खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी आहेत. पुन्हा अशी माणसं मिळणार नाही, जुनी माणसं ,सुखी समाधानी माणसं." तर आणखी एका यूजरने लिहलंय, "हीच आपली संस्कृती आणि हाच आपला ठेवा. किती कौतुक करावा आजोबांचं." 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीनाशिकसप्तश्रृंगी देवी मंदिर