Join us

"गावाकडेच श्रीमंती होती...", बालपणीच्या आठवणीत रमले सयाजी शिंदे, म्हणाले- "जेव्हा मागे वळून बघतो..."

By सुजित शिर्के | Updated: March 12, 2025 16:16 IST

"नि:स्वार्थी माणसांमध्ये...", गावाकडच्या आठवणीत रमले सयाजी शिंदे, म्हणाले...

Sayaji Shinde: दमदार अभिनयाबरोबर सामाजिक भान जपणारा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्याकडे पाहिलं जातं. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. साधं राहणीमान, उत्कृष्ट अभिनय, पिळदार मिशा आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन फिरणारा हा अभिनेता प्रत्येकाला भावतो. आजवर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. अशातच सयाजी शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांचा अभिनय प्रवास आणि बालपणीच्या सुंदर आठवणी शेअर केल्या आहेत.

नुकतीच अभिनेते सयाजी शिंदे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गाव आणि शहराकडील सध्याच्या वस्तुस्थितीवर भाष्य केलंय. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "माझं बालपण एकदम साधं, खेडेगावात गेलं. जिथे शहर बघण्याचा प्रश्नच नव्हता. सातवीला परीक्षेला आम्हाला साताऱ्याला जावं लागलं तेव्हा शहर पाहिलं. नि:स्वार्थी माणसांमध्ये लहानपण आनंदात गेलं. गाव एक कुटुंब असल्यासारखं वाटायचं. आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मनात असे विचार येतात की आपल्याला उगाच वाटतं आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढ्या गाड्या आहेत. पण, खरंच गावाकडे श्रीमंती होती."

पुढे अभिनेते म्हणाले, "म्हणजे, आता आमचा स्विमिंग पूल एवढा आहे, आमचं जिम एवढं आहे असं म्हटलं जातं. आता असं वाटतं की, तिकडे आमच्या गावात पाच विहिरी होत्या आणि दोन नद्या होत्या. त्यामध्ये पोहायला जायचं हेच आमचं वैभव होतं. मला नेहमी वाटतं की शहरं दरिद्र आहेत पण त्यांना दारिद्र्य कळत नाही आणि खेड्यांमध्ये श्रीमंती आहे ती त्यांना कळत नाही. आता असं वाटतं खेड्यात जाऊन राहिलं पाहिजे. असं जगणं खरं आहे. इकडचं जगणं काही खरं नाही." असं म्हणत सयाजी शिंदे यांनी त्यांच्या गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला. 

टॅग्स :सयाजी शिंदेमराठी अभिनेतासेलिब्रिटी